(मुंबई)
मुंबईतील एका पोलिसाचा लोकल ट्रेनमधील एका महिलेसोबत डान्स करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. ६ डिसेंबर रोजी ही घटना घडली. मध्य रेल्वेच्या लोकलच्या द्वितीय श्रेणी महिला डब्यात एक तरुणी नाचत आहे आणि तिच्या सोबत होमगार्डही नाचत आहे. जीआरपी मुंबईने या घटनेची दखल घेत होमगार्डवर योग्य कारवाई केल्याचे सांगितले आहे.
सायबा नावाच्या महिलेने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर गणवेशधारी होमगार्डसोबत एक व्हिडिओ शेअर केला. एसएफ गुप्ता असे होमगार्डचे नाव आहे. या व्हिडिओमध्ये ती महिला लोकल ट्रेनमध्ये नाचताना दिसत आहे. सुरुवातीला एसएफ गुप्ता या होमगार्डने त्या तरुणीला ट्रेनच्या दारापासून सुरक्षित अंतर राखण्याचा सल्ला दिला. मात्र, काही क्षणांनंतर, तो तिच्यासोबत सामील झाला आणि तरुणीसोबत संगीताच्या तालावर नाचू लागला. दरम्यान, डब्यातील इतर प्रवासी हे दृश्य रेकॉर्ड करताना दिसले.
तथापि, होमगार्डचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर लोकांच्या प्रतिक्रिया उमटू लागल्या. काहींनी चांगल्या प्रतिक्रिया दिल्या तर काहींनी चुकीचे असल्याचे सांगितले. परंतु बहुतेक जणांनी असा प्रकार चुकीचा आहे असे म्हटले. त्यांनतर विभागीय रेल्वे व्यवस्थापकाच्या अधिकृत खात्याने व्हिडिओमध्ये होमगार्डवर त्वरित कारवाई करण्यासाठी आरपीएफला टॅग केले. त्यांनतर हे प्रकरण वाढल्याने आरपीएफने याची दखल घेत सांगितले की, या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना आदेश देण्यात आले आहेत.
दिनांक ६/१२/२०२३ रोजी लोकल ट्रेन पेट्रोलिंग दरम्यान एक होमगार्ड गणवेशात नृत्य करत असल्याची व्हिडीओ व्हायरल होत आहे.
सदर घटनेची गांभीर्याने दखल घेऊन व सत्यता पडताळून, संबंधित होमगार्ड यांच्यावर योग्यती कारवाई केली आहे. अशा प्रकारच्या घटना भविष्यात घडू नये याकरिता दक्षता घेत आहोत.— GRP Mumbai (@grpmumbai) December 12, 2023
व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर गव्हर्नमेंट रेल्वे पोलिसांनी ट्विटरवर प्रतिक्रिया देत म्हणाले की, दिनांक ६/१२/२०२३ रोजी लोकल ट्रेनिंग पेट्रोलिंग दरम्यान एक होमगार्ड गणवेशात नृत्य करत व्हिडिओ व्हायरल होत आहे. सदर स्थितीची गांभीर्याने सुरक्षितता व सत्यता पाहाता, संबंधित होमगार्ड यांच्यावर योग्यती कारवाई केली आहे. अशा प्रकारच्या घटना भविष्यात पुन्हा घडू नये यासाठी काळजी घेऊ,असे जीआरपी मुंबई पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.