(रत्नागिरी)
श्रमिक किसान सेवा समिती संचालित लोकनेते शामरावजी पेजे कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालय शिवार आंबेरे, श्रमिक विद्यालय, क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले इंग्लिश मीडियम स्कूल अंतर्गत राष्ट्रीय सेवा योजना विभाग व सांस्कृतिक विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले जयंती सोहळा व स्त्रीमुक्ती दिन- बालिका दिन संपन्न झाला.
या सोहळ्याच्या अध्यक्षीय मनोगतातून नंदकुमार मोहिते यांनी आपले विचार व्यक्त करताना, इतिहासातील महान स्त्रियांच्या व्यक्तिमत्त्वाचा आढावा घेऊन सद्यस्थितीमध्ये असणारे स्त्रियांचे अस्तित्व, समाजामध्ये चाललेली अनैतिकता आणि शिक्षणाने सुधारलेली पिढी यामध्ये अंतर याचे वास्तव चित्र मांडताना स्त्रियांनी हे सगळं कमी करून वैचारिक प्रगतीला वाव देऊन समाज परिवर्तनाची ताकद अंगीकारली पाहिजे असे आवाहन केले.
प्राध्या. कल्पना मेस्त्री यांनी आपल्या मनोगतातून स्त्रियांनी गुलामगिरीच्या शृंखला तोडल्या असल्या तरी आजची स्त्री शिकली, सुशिक्षित झाली तरी समाजाकडे वळून पाहून सावित्रीबाईंचे कार्य लक्षात घेऊन समाज तळमळीची आस प्रत्येक स्त्रीच्या मनी रुजली पाहिजे व उद्याची भावी पिढी सक्षम होण्यासाठी स्त्रीयांनी उच्चत्तम विचारमूल्य रुजवणे काळाची गरज बनली आहे. खऱ्या अर्थाने असे स्त्रियांनी स्वप्न पाहिले तर हे सोहळे सार्थकी लागतील असे मत व्यक्त केले.
या कार्यक्रमाला श्रमिक किसान सेवा समितीचे संस्थापक अध्यक्ष नंदकुमार मोहिते, श्रमिक किसान सेवा समितीचे उपाध्यक्ष नारायण आग्रे, सहसचिव अविनाश डोर्लेकर, विजय मोहिते श्रमिक विद्यालय व लोकनेते शामरावजी पेजे कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य मधुकर थूळ, लोकनेते शामरावजी पेजे वरिष्ठ महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य राकेश आंबेकर, प्राध्यापक वृंद यांची उपस्थिती लाभली.
नऊ विद्यार्थ्यांनी आपल्या मनोगतातून सावित्रीबाई फुले यांच्या जीवन चरित्राचा आढावा घेतला. राष्ट्रीय सेवा योजना विभागातील विद्यार्थ्यांनी “मुलगी वाचवा मुलगी शिकवा” या विषयावर पथनाट्य सादर केले. कार्यक्रमाला बहुसंख्य विद्यार्थी उपस्थित होते. उपस्थित सर्वांचे स्वागत श्रमिक विद्यालयाचे शिक्षक श्री. दिवाकर तरळ यांनी केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कुमारी तन्वी हातीसकर, प्रास्ताविक कुमारी खुशी पेजे, आभार कुमारी संचिता शिर्सेकर हिने मानले.