(गणपतीपुळे / वैभव पवार)
लोककला संस्कृती आणि रंगभूमीच्या सेवेसाठी कार्यरत असलेल्या लोककला सेवक संस्था महाराष्ट्र या राज्यस्तरीय संस्थेच्या पाचव्या वर्धापन गौरव पुरस्कार सोहळ्यात रत्नागिरी तालुक्यातील धामणसे येथील प्रसिद्ध नामांकित कवी शाहिर सुनील लोगडे यांना कलारत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. हा गौरव पुरस्कार सोहळा नुकताच मुंबई विलेपार्ले ( पूर्व) येथील दीनानाथ मंगेशकर नाट्यमंदिरातील भव्य रंगमंचावर पार पडला.यावेळी सुनील लोगडे यांना कलारत्न पुरस्काराने लोककला सेवक संस्थेच्या प्रमुख पदाधिकारी आणि मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले.
सुनील लोगडे हे धामणसेसारख्या एका खेडेगावातील कलाकार असून ते वीस वर्षे लोककला क्षेत्रात कार्यरत आहेत.परंतु ते मूळचे धामणसे गावचे रहिवासी असले तरी लोककलेची कला ही त्यांनी मालगुंड या आपल्या मामाच्या गावी आत्मसात केली.त्या ठिकाणी चंडिका जाखडी कलापथकामध्ये त्यांनी शाहिर म्हणून आपली कला अधिकाधिक शिकून सर्वत्र आपल्या सुमधुर आवाजाने रसिक मायबाप यांचेवर मोठी छाप उमटवली.आपण शाहिर म्हणून घडण्यामागे आणि खऱ्या अर्थाने आजच्या स्पर्धात्मक युगातील रंगमंचावर शाहिर म्हणून नावारूपाला येण्यासाठी मालगुंड जोशीवाडी येथील चंडिका जाखडी कलापथक आणि राजे ग्रुप चे अत्यंत मोलाचे मार्गदर्शन लाभल्याचे सुनील लोगडे हे मनापासून सांगतात.
आपल्याला मिळालेला पुरस्कार हा सर्वप्रथम आपल्या आईवडिलांच्या चरणी अर्पण करीत असल्याचे सुनील लोगडे यांनी सांगितले.तसेच गेल्या वीस वर्षांत सर्व रसिक मायबाप व हितचिंतक सदैव पाठिशी राहिल्याने कलारत्न पुरस्कार हा बहुमान आपल्या पदरी पडल्याची भावना त्यांनी व्यक्त केली आहे.सुनील लोगडे यांची अनेक गाणी यू ट्यूब द्वारे प्रदर्शित झालेली आहेत.तसेच झी म्युझिक या यू ट्यूब च्यानलवर प्रसिद्ध भक्तीमय गीत ‘अंत नको पाहू’ या गीताला जगभरात प्रसिद्धी मिळाली आहे.यासाठी त्यांचे सहकारी पंकज घाणेकर आणि रोहित माचिवले यांचे विशेष मोलाचे सहकार्य लाभले आहे.
कलारत्न हा मानाचा पुरस्कार मिळाल्यानंतर कलाकार हा कितीही मोठा असो,कलाकार हा तुमच्या नियोजनामुळे घडतो,असे सुनील लोगडे यांनी म्हटले आहे. हा पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल सुनील लोगडे यांचेवर मालगुंड जोशीवाडी येथील चंडिका जाखडी कलापथक आणि राजे ग्रुप तसेच विविध संस्था, संघटना, ग्रामस्थ व विविध स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.