( नम्रता शिंदे )
एकविसाव्या शतकात मानवाने औद्योगिक क्रांती बरोबरच इंटरनेटचा वापर करुन अख्खे विश्व आपल्या कवेत ओढून घेतले आहे. अगदी वाखाणण्याजोगी प्रगती मानवाने केली आहे. परंतु म्हणतात ना, प्रत्येक नाण्याला दोन बाजू असतात. अगदी तसेच आपल्या डोळ्यांना सुखावणार्या प्रगतीच्या पाठीमागे अंधाराची झाक आहे. ज्यामुळे आपण बर्याच गोष्टी गमावत आहोत आणि त्यातीलच एक मुख्य असणारी गोष्ट म्हणजे वाचन संस्कृती होय…!
ज्याप्रमाणे शिक्षित आणि सुशिक्षित या दोन पूर्णपणे भिन्न संकल्पना आहेत म्हणजेच, सर्वच शिकलेली माणसे सुसंस्कृत असतीलच असे नाही. तसेच , ‘वाचन संस्कृती’ या शब्दाचे आहे. जी तत्त्वे माणसे जेव्हा आचरणात आणतात तेव्हा त्यातून संस्कृती निर्माण होते आणि हीच वाचन संस्कृती येथे अभिप्रेत आहे.
आपल्या सर्वांच्या ओळखीत अशी खूप लहान मुलं असतील जी मोबाईल किंवा टि.व्ही. पुढ्यात चालू असल्याशिवाय जेवत देखील नाहीत. आजकाल पालक आपल्या मुलांना एका जागी शांत बसवून ठेवण्यासाठी मोबाईल देताना दिसतात. अशावेळी तेवढी वेळ भागून जातेही परंतु, याचा दुरगामी परिणाम आपणच आपल्या मुलांच्या अखंड आयुष्यावर करत आहोत, याचा तिळमात्र अंदाजसुद्धा पालकांना नसतो. त्याऐवजी विविध रंगांची, आकारांची लहान पुस्तके जर पालकांनी आपल्या पाल्याला हाताळायला दिली तर त्या मुलात आवड, जिज्ञासा जागृत होईल. पर्यायाने त्याची मानसिक वाढ चांगल्या पद्धतीने होईल. बडबड गीते, बोधपर कथा, प्राणी, पक्षी, फुले, फळे यांची माहितीपर पुस्तके तसेच चित्रमय गोष्टींची पुस्तके, संस्कारगीते यांचा समावेश असलेले साहित्य वाचनाची सवय जाणीवपूर्वक मुलांना लावली आणि मुलांमध्ये कुतुहल जागृत केले, तर मुलांची विचार करण्याची क्षमता वाढीस लागेल, एकाग्रता वाढेल. याकरिता मुलांना वरचे वर भेट म्हणून खेळण्यांऐवजी पुस्तके देऊन त्यांच्या मनात आवड निर्माण करुन द्यावी. परंतु , तासनतास स्क्रीन समोर असल्याने आजकाल लहान मुलांमध्ये चष्मा लागण्याचे प्रमाण वाढले आहे. यामुळे मुलांच्या दृष्टीवर आयुष्यभरासाठी परिणाम होतोच, किंबहूना चष्मा हा त्यावर उपाय आहे पण, विचारांवर होणार्या परिणामाला उपायच नाही. उलट मुलांमध्ये नैराश्य, निष्क्रीयता, चिडचिडपणा वाढीस लागला आहे आणि या सर्व व्याधींवर एकच उपाय तो म्हणजे वाचन.
एखाद्या गोष्टीची मुलाला एकदा आवड निर्माण झाली की ती कायम स्वरुपात टिकून राहते. अगदी सोप्या- सोप्या सवयी आहेत ज्यामार्फत आपण आपल्या मुलांच्या मनात वाचनाची आवड निर्माण करुन वाचन संस्कृती जतन करण्यास हातभार लावू शकतो. उदा. वाढदिवसादिनी शाळेत चाॅकलेट्स न वाटता शाळेला दोन पुस्तके भेट म्हणून द्यावीत. जेणेकरून शाळेचे वाचनालयही समृद्ध होईल. तसेच घरात छोटेखानी वाचनालय असावे ज्यात मुलाच्या आवडीची पुस्तके असावीत. खरंतर वाचनाची आवड मुल शाळेत दाखल होण्यापूर्वी घरातूनच लागायला हवी. आजकाल मुलाला पंधरा – वीस हजाराचा मोबाईल घेताना पैशाचा विचार केला जात नाही. पण, शंभर – दोनशे रुपयांचे पुस्तक मुलांसाठी घेताना पालक दहा वेळा विचार करतात. मोबाईल हा सद्ध्याच्या काळात गरजेचा आहेच पण शंभर – दोनशे रुपयांचे एखादे पुस्तक मुलाच्या आयुष्यात टर्निंग पाँईंट ठरु शकेल. याचा पालकांना विसर पडतो आणि मग इथूनच सुरु होते सगळी गडबड. मोबाईलच्या अतिवापराने अलिकडे मुले उशीरा बोलायला लागली आहेत तर काही मुले वयाच्या सहा – सात वर्षांपर्यंत बोबडे बोलताना दिसून येत आहेत.
पुर्वीच्या काळी संस्कृत श्लोकाचे वाचन पठण करायला लावत असल्याने लहान वयातच मुलांचे उच्चार स्पष्ट व शुद्ध होत असत. मुले ही अनुकरणप्रिय असतात, हे तर आपणा सर्वांना ज्ञात आहेच. त्यामुळे वाचन संस्कृती आपल्या घरापासून वाढीस लावण्यासाठी पालकांचा खूप मोठा हातभार असला पाहिजे. जर पालकच हातात मोबाईल घेऊन व्यस्त राहणारे असतील तर त्यांची मुले त्यांचेच अनुकरण करणार…
ज्याप्रमाणे आजारी पडल्यावर कितीही कडू असलेले औषध आपण तंदुरुस्त होण्यासाठी घेतो त्याचप्रमाणे मनाचे आरोग्य निरोगी व तंदुरुस्त, अबाधित राखण्यासाठी वाचन करणे खूप गरजेचे आहे. असे म्हणतात की,पुस्तक हा माणसाचा खूप जवळचा मित्र आहे. जिथे वाचन आहे तिथे प्रगती आहे.कारण वाचनानेच माणूस समृद्ध होतो. आपल्या ध्येयाच्या दिशेने मार्गक्रमण करतो. वाचनाने आपले अनुभवविश्व, भावविश्व संपन्न होते. पुस्तक कोणतेही असो ते आपल्याला ज्ञान मिळवून देते. चांगल्या वाईटाची जाण करुन देते. परंतू बर्याच लोकांचा असा समज असतो की,’पुस्तक वाचायला घेतलं की आम्हाला झोप येते’. अशा लोकांनी एक प्रयोग करुन बघायला हरकत नाही, या प्रयोगाच्या प्राथमिक अवस्थेत खूप जड,कठीण शब्दांची, खूप वैचारिक अथवा दुःखद भावनांनी ओतप्रोत अशा साहित्यकृती वाचण्याऐवजी आरंभी, हलके -फुलके, मनाला आनंद देणारे, मनोरंजक साहित्य वाचनात घ्यावे आणि मुख्य म्हणजे प्रत्येक साहित्याचा मनापासून आस्वाद घ्यावा. एक पान वाचत असताना पुढच्या पानावर काय असेल अशी उत्कंठा वाचकाच्या मनात उत्पन्न करणार्या साहित्यकृती प्रथम वाचाव्यात.
वाचनाची बदलती माध्यमे सध्या संक्रमण अवस्थेत आहे. छापील माध्यमांचा डिजिटल माध्यमांच्या दिशेने प्रवास सुरु आहे. सध्याचे यूग हे डिजिटल यूग आहे त्यामुळे, काळानुरुप बदलणार्या वाचन माध्यमांचा आपण स्वीकार केला पाहिजे. तथापि, नवे कोरे करकरीत पुस्तक उघडून वाचण्याचा जो काही अत्युच्य आनंद आहे त्याची तुलना कशाशी नाही आणि हा अनुभव प्रत्येकानेच आपल्या आयुष्यात वरचेवर घ्यावा आणि लुप्त पावणार्या वाचन संस्कृतीच्या जतनात आपल्या पिढीकडून खारीचा वाटा उचलावा.