(औरंगाबाद)
विनोदी किर्तनासाठी राज्यभर प्रसिद्ध असलेले इंदुरीकर महाराज यांच्या अडचणीत मोठी भर पडली आहे. किर्तनात लिंगभेदाबाबत वादग्रस्त वक्तव्य केल्याच्या आरोपावरून त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठाने दिले आहेत. जिल्हा सत्र न्यायालयाने इंदुरीकरांना दिलासा दिल्यानंतर अंधश्रद्धा निर्मूलन समिती आणि राज्य सरकार औरंगाबाद खंडपीठात धाव घेतली होती. त्यानंतर शुक्रवारी खंडपीठाने हे आदेश दिले आहेत.
काही महिन्यांपूर्वी इंदुरीकरांनी आपल्या किर्तनात लिंगभेदाबाबत वादग्रस्त वक्तव्य केले होते. सम तारखेला आणि विषम तारखेला शरीरसंबंध आल्यानंतर कसा मुलगा किंवा मुलीचा जन्म होतो, याबाबतचे वक्तव्य त्यांनी केले होते. मात्र हे विधान गर्भलिंग निदान निवडीची जाहिरात असून PCPNDT कायद्याच्या कलाम 22 चे उल्लंघन असल्याचा आरोप करत त्यानुसार PCPNDT सल्लागार समितीने निवृत्ती महाराज इंदुरीकर यांना नोटीस पाठवून खुलासा मागितला होता. त्याच दरम्यान या प्रकरणात गुन्हा दाखल करावा म्हणून प्रथम वर्ग न्यायालयात 156 (3) याचिका करण्यात आली होती. या वक्तव्यानंतर अंधश्रद्धा निर्मूलन समिती आणि राज्य सरकारने याप्रकरणी तक्रार दाखल केली होती. या प्रकरणाचा खटला जेएमएफसी न्यायालयात चालला. या न्यायालयाने त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले.
या आदेशाविरोधात इंदुरीकर महाराजांनी जिल्हा सत्र न्यायालयात धाव घेतली आणि सत्र न्यायालयाने जेएमएफसी न्यायालयाचा आदेश रद्द केला. त्यामुळे अंधश्रद्धा निर्मूलन समिती आणि राज्य सरकारच्या वतीने औरंगाबाद खंडपीठात धाव घेतली. त्यानंतर औरंगाबाद खंडपीठाने शुक्रवारी या प्रकरणाचा निकाल देत गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले.