(मुंबई)
गेल्या वर्षां एसटी महामंडळाचे सरकारमध्ये विलिनीकरणाच्या मागणीसाठी राज्यभरातील एसटी कर्मचाऱ्यांनी बेमुदत काम बंद आंदोलन पुकारले होते. त्यावेळी जवळपास ३ महिने आंदोलन चालले होते. तेव्हा महामंडळाने अनेक मागण्या मान्य करण्याचे आश्वासन दिल्यानंतर कर्मचाऱ्यांनी संप मागे घेतला होता. मात्र, अजूनही एसटी महामंडळाने या मागण्या मान्य न केल्याने महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेने १३ सप्टेंबर पासून बेमुदत उपोषणाची हाक दिली आहे.
महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेने आपल्या विविध २९ प्रलंबित मागण्यांसाठी १३ सप्टेंबरपासून राज्यभरात बेमुदत उपोषण करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे एसटीची चाके एन गणेशोत्सवात थांबण्याची शक्यता आहे. दरम्यान उपोषण आंदोलनात सामील होणाऱ्या कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई करण्याचे आदेश एसटी महामंडळाचे सामान्य प्रशासन विभागाचे महाव्यवस्थापक अजित गायकवाड यांनी दिले आहेत.
दरम्यान या बेमुदत उपोषणापूर्वी ११ व १२ सप्टेंबर रोजी महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेचे पदाधिकारी सरकारचे लक्ष वेधण्यासाठी मुंबई येथील आझाद मैदानावर उपोषण करणार आहेत, जर या दोन दिवसात सरकारने एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांसाठी चर्चा करण्यास न बोलावल्यास १३ पासून राज्य भरात एसटी कामगार संघटने तर्फे उपोषण पुकारले जाणार आहे.
आंदोलनात सामील होणाऱ्या चालक व वाहकांवर महामंडळाकडून शिस्तभंगाची कारवाई करण्यात येणार आहेत. तसेच कर्मचाऱ्यांना उपोषणाला बसण्यापासून प्ररावृत्त करण्यासाठी एसटी महामंडळातील अधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांना भेटण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
४ हजार ८४९ कोटी रुपयांमधील शिल्लक रकमेचे वाटप त्वरीत करा, दहा वर्षांसाठी सातवा वेतन आयोग लागू करावा, अपहार प्रवण वाहकांचे बदली धोरण रद्द करा, खाजगी गाड्यांऐवजी स्वमालकीच्या नवीन बसेसचा पुरवठा त्वरीत करावा, लिपिक-टंकलेखक पदाच्या बढतीसाठी २४० हजर दिवसांची अट रद्द करा, सेवानिवृत्तांना पत्नीसह व विद्यमान कर्मचाऱ्यांना सर्व प्रकारच्या गाड्यांचा वर्षभर मोफत फॅमिली पास देण्यात यावा यासह इतरही मागणी एसटी कामगार संघटने तर्फे केली गेली आहे.