रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी व्हायब्रंट गुजरात समिट 2024 मध्ये बोलताना म्हटले आहे की, रिलायन्स ही गुजराती कंपनी होती, आहे आणि कायम राहील. आपली कर्मभूमी ही गुजरातच असल्याचे सांगण्यावर जोर देत त्यांनी म्हटले की, “गुजरात ही मातृभूमी आहे, गुजरात हीच तुमची कर्मभूमी राहिली पाहिजे” असे सांगून अंबानी यांनी त्यांचे वडील धीरूभाई अंबानी यांच्या मार्गदर्शनाचे स्मरण केले. “रिलायन्स ही गुजराती कंपनी होती, आहे आणि कायम राहील,” असे त्यांनी जाहीर केले आणि राज्यातील सात कोटी रहिवाशांच्या स्वप्नांसाठी योगदान देण्याचे वचनही त्यांनी या वेळी दिले.
रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडचे अध्यक्ष मुकेश अंबानी व्हायब्रंट गुजरात ग्लोबल परिषेदेत बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कौतुक केले. मुकेश अंबानी यांनी यावेळी मोदी है तो मुमकीन है या शब्दांनी आपल्या भाषणाची सुरुवात केली. अंबानी म्हणाले, जेव्हा मला माझे परदेशी मित्र विचारतात की मोदी है तो मुमकीन है चा अर्थ काय आहे, तेव्हा मी म्हणतो की भारताचे पंतप्रधान एक व्हिजन तयार करतात आणि ते अंमलात आणतात. ते अशक्य गोष्टीलाही शक्य करून दाखवतात. ते भारताच्या इतिहासातील सर्वात यशस्वी पंतप्रधान आहेत. जेव्हा पंतप्रधान मोदी बोलतात तेव्हा संपूर्ण जग ऐकते. अंबानी यांनी व्हायब्रंट गुजरात परिषदेच्या यशाचे श्रेय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिले.
मुकेश अंबानी यांनी गुजरात राज्याशी खोलवर रुजलेल्या संबंधाचा पुनरुच्चार केला आणि गुजरातच्या आर्थिक विकासासाठी कंपनीच्या अटळ समर्पणाबाबतही पुष्टी केली. आपल्या गुजराती वारशाचा अभिमान व्यक्त करत अंबानी यांनी शिखर परिषदेत आपल्या भाषणात पाच महत्त्वाच्या वचनबद्धतेची घोषणा केली. पुढील दशकात गुजरातमध्ये रिलायन्स इंडस्ट्रीजकडून भरीव गुंतवणूक सुरू ठेवण्याचे आश्वासन त्यांनी दिले. याव्यतिरिक्त, 2030 पर्यंत राज्याला हरित ऊर्जेची निम्मी गरज पूर्ण करण्यासाठी मदत करण्याचे कंपनीचे उद्दिष्ट आहे, असेही ते म्हणाले.
5G-सक्षम AI क्रांती गुजरातच्या अर्थव्यवस्थेत भर घालेन
अंबानी यांनी रिलायन्स जिओद्वारे 5G पायाभूत सुविधांच्या यशस्वी रोलआउटवर भर दिला. ज्यामुळे गुजरात पूर्णपणे 5G सक्षम झाला. 5G-सक्षम AI क्रांती गुजरातच्या अर्थव्यवस्थेत भर घालतील, लाखो रोजगाराच्या संधी निर्माण करतील आणि आरोग्यसेवा, शिक्षण आणि कृषी यासारख्या क्षेत्रात क्रांती घडवून आणतील असा अंदाज त्यांनी व्यक्त केला. गुजरातच्या शेतकऱ्यांशी असलेल्या त्यांच्या वचनबद्धतेनुसार, अंबानी यांनी वचन दिले की रिलायन्स रिटेल दर्जेदार उत्पादने वितरीत करेल आणि कृषी समुदायांना सक्षम करेल. त्यांनी हाजीरा येथे भारतातील पहिल्या कार्बन फायबर सुविधेबाबतही भाष्य केले.
ऑलिम्पीक 2036 संदर्भात भारताच्या शिक्षण, क्रीडा आणि कौशल्य पायाभूत सुविधा वाढवण्यासाठी रिलायन्स आणि रिलायन्स फाउंडेशन इतरांसोबत सहयोग करतील. या सहयोगी प्रयत्नाचा उद्देश भविष्यातील क्रीडा प्रतिभेचे संगोपन करणे आणि देशाच्या सर्वांगीण विकासात योगदान देणे आहे, असे अंबानी म्हणाले.