(पुणे / प्रतिनिधी )
पुणे येथील प्रसिध्द चपराक प्रकाशनने नव्याने सुरु केलेल्या ‘ लाडोबा ‘ या मासिकाचे प्रकाशन नुकतेच शिक्षण संचालक दिनकर टेमकर यांच्या हस्ते करण्यात आले . यावेळी चपराकचे संपादक घन:श्याम पाटील , ज्योती पाटील , रविंद्र कामठे , अरुण कमळापूरकर आदि उपस्थित होते . लाडोबाच्या जूनच्या अंकात बालभारतीच्या अभ्यासक्रम पुनर्रचना समितीचे सदस्य संदीप वाकचौरे यांनी असामान्यांचे सामान्यत्व सांगितले आहे. पूजा देखणे यांचा ‘गंमत भावनांची’ हा अभ्यासपूर्ण आणि उपयुक्त लेख आहे.
सुप्रसिद्ध साहित्यिक नागेश शेवाळकर, राज्य पुरस्कार विजेते लेखक एकनाथ आव्हाड, बालकुमार साहित्य संस्थेच्या अध्यक्ष डॉ. संगीता बर्वे, ज्येष्ठ लेखक गोविंद गोडबोले आदींच्या संस्कारशील, माहिती, मनोरंजन आणि ज्ञान देणाऱ्या कथा आहेत. ‘चपराक’ परिवाराचे लेखक शिरीष पद्माकर देशमुख यांचे नुकतेच निधन झाले. त्यांची ‘बोलणारं झाड’ ही प्रबोधनपर कथा या अंकात आहे.
मुलांपर्यंत जगभरातील उत्तमोत्तम गोष्टी पोहचाव्यात, त्यांना श्रेष्ठ बालसाहित्याचा परिचय व्हावा या हेतूने ‘चल रे भोपळ्या टुणूक टुणूक’ या मराठी आणि बंगाली लोककथेचा मेळ घालून डॉ. पृथ्वीराज तौर यांनी या कथेचे पुनःकथन केले आहे. विनोद पंचभाई यांची शब्दचित्र कथा मुलांत वाचनाची गोडी निर्माण करते. ‘लाडोबाचा आवाज’ या स्पर्धेच्या विजेत्यांची नावेही या अंकात जाहीर करण्यात आली आहेत. तसेच बालचमुंच्या चित्रांचाही समावेश करण्यात आलाय.
सुप्रसिद्ध कवी आणि गीतकार प्रवीण दवणे, दासू वैद्य, राजेंद्र सोमवंशी, राजेंद्र उगले, जया पाटील, शशी त्रिभुवन, प्रशांत केंदळे यांच्या बहारदार कविता आहेत. नामवंत चित्रकार संतोष घोंगडे यांनी रेखाटलेली आकर्षक चित्रे, राजेश कदम यांनी केलेली उत्तम मांडणी, संपूर्ण आर्ट पेपरवरील रंगीत छपाई, ज्योती पाटील यांच्या कल्पकतेतून अंकातील साहित्याचे मुलांकडूनच करून घेतलेले अभिवाचन आणि त्याचे अंकात दिलेले क्यू आर कोड यामुळे ‘लाडोबा’चा अंक वाचनीय, प्रेक्षणीय आणि श्रवणीय देखील झाला आहे.
तीन ते १५ वयोगटातील मुला-मुलींच्या हातात, संग्रहात असायलाच हवा असा हा अंक आहे. त्यामुळे ‘लाडोबा’चे सभासद नक्की व्हा. केवळ एक हजार रुपयात दिवाळी अंकासह अकरा अंक आपल्याला घरपोच मिळणार आहेत. या दर्जेदार अंकाचे सभासद होण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी संपर्क – 7057292092 केवळ व्हाट्सॲप .