( लाटवण/किशोर कासारे )
मंडणगड तालुक्यातील लाटवण हायस्कूलच्या माजी विद्यार्थी संघटनेतर्फे लाटवण हायस्कूलचे माजी विद्यार्थी सन १९९४-१९९५ या दहावी बॅचच्या माजी विद्यार्थ्यांनी आपल्या विद्यालयाच्या भौतिक गरजा ओळखून सुमारे ३० हजार रुपये खर्चून शैक्षणिक उठाव घडवून आणला आहे.
लाटवण पंचक्रोशी माध्यमिक विद्यामंदिर लाटवण या विद्यालयात एकत्रित येऊन शाळेच्या विकासासाठी विचारविनिमय केला. या विधायक विचारातून माजी विद्यार्थ्यांचे कृतज्ञतापूर्वक शाळेसाठी हात पुढे सरसावले.
विशेष म्हणजे या बॅचने शाळेचे प्रमुख प्रवेशद्वाराची दुरुस्ती करून सुबक पध्दतीने रंगरंगोटी करून दिली. प्रवेशद्वारावरील शाळेचे नाव निरंतर प्रकाशमान व्हावे, यासाठी बोर्डसह लाईट सुविधा उपलब्ध करून दिली. शाळेच्या आवारातील वर्ग, कार्यालय ,संगणक कक्ष, ग्रंथालय कक्ष अशा अनेक नवीन नामपाट्या तयार करून प्रशालेचे विद्यमान मुख्याध्यापक श्री. विजय खाडे यांच्याकडे सुपूर्द केल्या.शाळेच्या अत्यावश्यक बाबींकडे लक्ष वेधून माजी विद्यार्थ्यांनी कर्तव्य भावनेने मदतीचा हात पुढे केला.
माजी विद्यार्थी संघटनेतर्फे विद्यार्थ्यांची २५ वर्षानंतरच्या अनोखी भेटीबद्दल शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी व पालक यांनी मनापासून आनंद व्यक्त करत माजी विद्यार्थ्यांना धन्यवाद दिले.अनेक वर्षांनी विद्यार्थी विद्यार्थीनी एकमेकांना भेटताना एक वेगळा आनंद अनुभवला.अंधुक झालेल्या जुन्या आठवणींना उजाळा दिला. त्याचबरोबर आपली शाळा, आपले वर्ग, आपले विषय शिक्षक यांच्या विषयीच्या आठवणी जाग्या केल्या.शाळेने केलेले संस्कार आणि यामुळे आपण घडलो ही भावना प्रत्येकाने बोलून दाखवली. संस्कार हे शाळेमध्येच होतात, त्यामुळे आम्ही या शाळेचे ऋणी आहोत.असे अनेकांच्या तोंडून सहजपणे शब्द उमटले.यातूनच आपण आपल्या हायस्कूलच्या विकासासाठी हातभार लावला पाहिजे ,ही भावना प्रबळ झाली आणि या भावनेतूनच विद्यार्थी एकत्र आले. शाळेविषयी कृतज्ञता व्यक्त केली.या कार्यक्रमासाठी हायस्कूलच्या स्कूल कमिटीचे चेअरमन ,सर्व सदस्य उपस्थित होते .या कार्यक्रमाचे संपूर्ण नियोजन लाटवण हायस्कूल माजी विद्यार्थी संघटना व हायस्कूलचे मुख्याध्यापक व सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी केले होते.