(रत्नागिरी)
संगमेश्वर ग्रामीण रुग्णालय येथील नेत्र चिकित्सा अधिकारी राजेंद्र झाड यांनी लाचलुचपत प्रतिबंधात्मक कार्यालय रत्नागिरी यांच्याकडे आपल्याकडे लाच मागितली अशी तक्रार दिली होती. ते नेत्रचिकित्सा अधिकारी असून त्यांना संगमेश्वर तालुक्यात विविध प्राथमिक आरोग्य केंद्रांना भेटी द्याव्या लागतात. त्याप्रमाणे त्यांचे दर महिन्याचे बिल तयार होते. त्यांनी केलेल्या तक्रारी प्रमाणे त्यांच्या रुग्णालयातील जुनिअर क्लर्क श्री धनंजय तेरखेडकर हे बिले तयार करण्याचे काम करीत असत. तेरखेडकर यांनी एप्रिल 2016 ते ऑगस्ट 2016 चे कालखंडाचे बिलाचा चेक तक्रारदार झाड यांचे नावे देण्यासाठी लाचेची मागणी केली होती. त्यामुळे तक्रारदार झाड यांनी दिनांक 10/4/2017 रोजी एसीबी रत्नागिरी यांचेकडे तक्रार लेखी स्वरूपात दिली होती.
त्यानंतर दिनांक 12/4/2017 रोजी सापळा आयोजित करण्यात आला व श्री तेरखेडकर यांना लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडण्यात आले अशी सरकार पक्षाची केस होती. तर संशयित आरोपीच्यावतीने रत्नागिरीतील प्रसिद्ध वकील ॲडव्होकेट संकेत घाग यांनी पाहिले काम आहे.
प्रस्तुतच्या केस मध्ये तक्रारदार राजेन्द्र झाड, पंच साक्षीदार रुपेश होरंबे, पोलीस कॉन्स्टेबल विशाल नलावडे, दोषारोप पत्र दाखल करण्यास मंजुरी देणारे देणारे अधिकारी डॉ.पंढरीनाथ धारूरकर आणि तपासीक अंमलदार लक्ष्मण सोनवणे यांच्या साक्षी सरकार पक्षाद्वारे नोंदवण्यात आल्या होत्या.
यावेळी आरोपी तर्फे तक्रारदार यांनी केलेली तक्रार ही खोटी असल्याचे प्रतिपादन करण्यात आले. तसेच त्याला तक्रारदाराने सापळा कारवाईचे दरम्याने फसवले होते असा संशयित आरोपीच्या वतीने बचाव घेण्यात आला होता. तसेच तक्रारदाराच्या आरोपाप्रमाणे कोणत्याही स्वरूपाचा चेक देण्यासाठी संशयित आरोपीने लाचेची मागणी केली नव्हती व लाच स्वीकारली नव्हती असे त्यांचे म्हणणे होते.
संशयित आरोपी तर्फे रत्नागिरीचे प्रसिद्ध वकील ॲडव्होकेट संकेत घाग यांनी काम पाहिले व आरोपीतर्फे बचाव मांडला. त्यांना ॲडव्होकेट गायत्री मांडवकर व ॲडव्होकेट महेश मांडवकर यांनी सहाय्य केले.
रत्नागिरीचे प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश श्री राजाराम जोशी यांनी दिनांक 23 ऑगस्ट 2023 रोजी प्रस्तुतचे प्रकरणी न्याय निर्णय जाहीर केला व या प्रकरणी संशयाचा फायदा देण्यात येऊन आरोपीची सबळ पुराव्या अभावी निर्दोष मुक्तता केली.