(मुंबई)
केंद्रीय अन्वेषण ब्युरोने जीएसटी अधिका-याला लाच घेताना अटक केली आहे. यावेळी सीबीआयने सुमारे ४३ लाख रुपयांची रोकड जप्त केली. सीबीआयने सीजीएसटीच्या एका अधीक्षकाला पाच लाख रुपयांची लाच मागितल्याबद्दल आणि स्वीकारल्याबद्दल अटक केली. अटक करण्यात आलेल्या जीएसटी अधिका-याचे नाव हेमंत कुमार असून ते सीजीएसटीच्या भिवंडी आयुक्तालय अधीक्षक पदावर कार्यरत आहेत.
कंपनीचे प्रलंबित जीएसटी प्रकरण निपटवण्यासाठी ३० लाख रुपयांचा अवाजवी फायदा मागितल्याच्या आरोपावरून सीजीएसटी अधीक्षक हेमंत कुमार यांच्याविरुद्ध तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर आरोपींने लाच म्हणून १५ लाख रुपयांच्या रकमेची बोलणी केली. याच लाचेचा पहिला हप्ता घेताना या जीएसटी अधिका-याला सीबीआयने रंगेहाथ अटक केली.
लाचेचा पहिला हप्ता म्हणून तक्रारदाराकडून पाच लाख रुपयांची लाच घेताना सीबीआयने सापळा रचून आरोपी हेमंत कुमारला रंगेहात पकडले. मुंबई, गाझियाबाद येथील आरोपींच्या कार्यालयात आणि निवासस्थानावर झडती घेण्यात आली असून त्यामध्ये ४२.७० लाख रुपयांची रोख रक्कम तसेच मालमत्तेशी संबंधित कागदपत्रे आणि इतर दोषी दस्तऐवज जप्त करण्यात आला आहे.