(रत्नागिरी)
तालुक्यातील कोतवडे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील लाचखोर आरोग्य सहायकाला न्यायालयाने गुरुवारी (२ नोव्हेंबर) जामीन मंजूर केला. आता पोलिसांचा अहवाल आल्यानंतर आरोग्य विभागाकडून पुढील निलंबनाची कारवाई करण्यात येणार आहे.
शैलेश आत्माराम रेवाळे (३८, रा. रत्नागिरी) याला मंगळवारी सकाळी रत्नागिरीतील एका हॉटेलमध्ये १५ हजार रुपयांची लाच घेताना रत्नागिरी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले होते. त्याला न्यायालयाने एक दिवसाची पोलिस कोठडी सुनावली होती. त्यानंतर गुरुवारी त्याला जामीन मंजूर करण्यात आला.
तक्रारदाराला त्याच्या मालकीच्या बांधकामाकरिता आवश्यक असणारा आरोग्य विभागाकडील नाहरकत दाखला मिळण्यासाठी त्यांनी अर्ज केला होता. हा तयार केलेला अर्ज स्वीकारण्यासाठी व त्याबाबतचे कामकाज पूर्ण करून नाहरकत दाखला देण्यासाठी रेवाळे याने पैशाची मागणी केली होती. त्यानुसार मंगळवारी (३१ ऑक्टोबर) रत्नागिरी येथील एका हॉटेलमध्ये रेवाळे याला लाचेची रक्कम स्वीकारताना रंगेहाथ पकडले होते. त्याच्यावर आरोग्य विभागाकडून लवकरच निलंबनाची कारवाई करण्यात येणार आहे