(पुणे)
पुण्यातील महसूल विभागतील अतिरिक्त विभागीय आयुक्त अनिल रामोड यांना पदावरून निलंबित करण्यात आले आहे. लाच घेतल्याप्रकरणी मागील आठवड्यात त्यांच्या निलंबनाचा प्रस्ताव आयुक्तालयाला पाठवण्यात आला होता. हा प्रस्ताव राज्य सरकारकडे सुपूर्द करण्यात आला होता. त्यानुसार राज्य सरकारने रामोडांच्या निलंबनाचे आदेश काढले.
डॉ. अनिल रामोड यांना ९ जून रोजी आठ लाख रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आले होते. याप्रकरणी त्यांना अटक करण्यात आली. सीबीआय’ने ही कारवाई ‘ केली होती. सीबीआयच्या मागणीनुसार विभागीय आयुक्तालयाने राज्य सरकारकडे रामोड यांच्या निलंबनाचा प्रस्ताव पाठविला होता. या प्रस्तावाला मान्यता देत, सरकारने त्यांच्या निलंबनाचे आदेश दिले. रामोड यांच्या निलंबनानंतरही त्यांनी पुणे मुख्यालय सोडून जाऊ नये. कोणतीही खाजगी नोकरी किंवा व्यवसायही करू नये. त्याचबरोबर, विभागीय आयुक्तांची परवानगी न घेता पुणे शहर सोडू नये, असे निलंबनाच्या आदेशात नमूद केले आहे.
दरम्यान, रामोड यांच्या कार्यालयासह बाणेर (पुणे) आणि नांदेड येथील घरांवर ‘सीबीआय’ने छापे टाकले होते. या कारवाईत ‘सीबीआय’च्या हाती मोठे घबाड लागले होते. यात तब्बल सहा कोटी रुपयांची रोख रक्कम आणि बेहिशेबी मालमत्तेच्या कागदपत्रांचा समावेश होता.