(खेड / प्रतिनिधी)
खेड तालुक्यातील हुंबरी येथे जंगलात लाकडे आणण्यासाठी गेलेल्या 23 वर्षीय तरुणीचा सर्पदंशाने मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. जना रमेश पवार (23, रा. वरची हुंबरी आदिवासीवाडी, खेड) असे मृत्यू झालेल्या तरुणीचे नाव आहे. ही घटना 31 ऑक्टोबर रोजी दुपारी 2 वा. च्या सुमारास घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जना ही तिची बहीण रोशनी हिच्यासोबत घराच्या बाजूला असलेल्या जंगलमय भागात जळणासाठी लाकडे आणायला गेली होती. कडक उन्हात तिला तहान लागली म्हणून ती पाणी पिण्यासाठी एका पाण्याच्या झर्याजवळ गेली. यावेळी तिला सर्पाने दंश केला. तिच्या नाका तोंडातून फेस येवु लागला. तिचे शरीर निळसर पडू लागले. बहिणीने लगेचच ही गोष्ट गावातील लोकांना सांगितले. लोकांनी तिथे जावून तिला घरी आणले. मात्र तिचा मृत्यू झाला होता.
जनाच्या मृत्यूने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. या घटनेची खेड पोलीस स्थानकात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.