(रत्नागिरी)
प्रशिक्षित लाईनमन नसल्याचे माहीत असूनही अक्षय अशोक फुटक या तरुणाला इलेक्ट्रिक पोलवर चढवले. त्यावेळी जम्प सोडवण्याचे काम करत असताना शॉक लागून अक्षयचा मृत्यू झाला. या प्रकरणी १ वर्ष ३ महिन्यांनंतर त्याच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी त्या सुपरवायझर विरोधात ग्रामीण पोलिस ठाण्यात रविवार २३ जुलै रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संतोष शरद सोवनी असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या सुपरवायझरचे नाव आहे.
संतोष हा साळवी स्टॉप येथील सुयोग पावर लाईन्स इंडस्ट्रीजमध्ये सुपरवायझर म्हणून काम करतो. याच कंपनीत अक्षय फुटक हा हेल्पर म्हणून नोकरीला होता. या सुयोग कंपनीचे एमएसईबी सोबत इलेक्ट्रिक पोल उभे करणे, नवीन डी. पी. बसवणे, नवीन लाईन ओढणे या कामांचे कॉन्ट्रॅक्ट झालेले आहे. ४ एप्रिल २०२२ रोजी सकाळी ११ वा. एमआयडीसी मिरजोळे येथील अग्निशमन दलाच्या आफीसच्या बाजुला नवीन डी. पी. बसवण्याचे काम सुरू होते. त्यावेळी संतोषने अक्षय फूटक हा प्रशिक्षित लाईनमन नसल्याचे माहित असतानाही त्याला पोलवर चढवले. जम्प सोडवण्याचे काम करत असताना वायरचा शॉक बसून अक्षय जमिनीवर पडला. गंभीर जखमी अवस्थेत त्याला उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले असता त्याचा मृत्यू झाला होता.
या प्रकरणी ग्रामीण पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली होती. याबाबत तपासाअंती संशयित संतोष सोवनीने नवीन डी. पी. बसवण्याच्या ठिकाणचा विद्युत पुरवठा अर्थिग करून जम्प सोडवून बंद करतो असे एमएसईबी च्या लाईनमनला सांगूनही विद्युत पुरवठा बंद झाला की नाही याची खात्री न करताच अक्षयला पोलवर चढवल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे अक्षय फुटकच्या मृत्यूच कारणीभूत ठरल्याप्रकरणी रविवारी हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.