(लांजा)
लांजा शहरात भटक्या कुत्र्यांनी उच्छाद मांडला असून रविवारी ९ जुलै रोजी दिवसभरात १४ जणांवर हल्ला करून जखमी केले आहे. यामध्ये लहान मुलांसह, महिला, वयोवृद्ध यांचा समावेश आहे. भटक्या कुत्र्यांच्या या हल्ल्यामुळे लांजा शहरात प्रचंड दहशत निर्माण झाली असून लांजा नगरपंचायतीने भटक्या कुत्र्यांचा तातडीने बंदोबस्त करावा अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.
लांजा शहरात गेल्या अनेक दिवसांपासून झुंडीने फिरणाऱ्या भटक्या कुत्र्यांचा उपद्रव हा वाढला आहे. या भटक्या कुत्र्यांच्या उपद्रवाचा फटका हा मुलांसह नागरिकांना बसत आहे. मात्र आजवर या भटक्या कुत्र्यांबाबत नगरपंचायतीकडून कोणत्याही प्रकारची ठोस कारवाई करण्यात आलेली नाही. त्यामुळे नागरिकांकडून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.
रविवारी ९ जुलै रोजी लांजा साटवली फाटा, दूध डेअरी, लांजा बाजारपेठ आदी विविध परिसरात या भटक्या कुत्र्यांकडून लहान मुले, महिला, तरुण तसेच वृद्धांवर हल्ले झाले. कुत्र्यांनी केलेल्या या हल्ल्यात लांजा शहरासह तालुक्यातील एकूण १४ जण जखमी झाले आहेत. यामध्ये अश्रफ रखांगी (६० वर्षे, रा. लांजा), शुभम अनिल पवार (२५ वर्षे, रा. लांजा), क्रांती किरण भाईशेट्ये (३६ वर्षे, रा. लांजा), संजय सखाराम पुजारी (४० वर्षे, रा. इंदवटी ता. लांजा), गजानन रघुनाथ हळदणकर (७० वर्षे, रा. देवधे ता. लांजा), संदीप गुणाजी नेमण (५२ वर्षे, रा. रूण ता. लांजा), अस्मिता बेंगलूर (रा. लांजा), अनुष्का संजय यादव ( १३ वर्षे, रा. लांजा), सुचित्रा चंद्रकांत कांबळे (रा. लांजा), वामन विठ्ठल वालकर (६५ वर्षे, रा. बेनीखुर्द), सुभद्रा शांताराम गोसावी (७०वर्षे, रा. लांजा), श्रीम. रखांगी (रा.लांजा) यांचा समावेश आहे.
दरम्यान, कुत्र्यांच्या या हल्ल्यामुळे शहरातील नागरिकांमध्ये प्रचंड दहशत निर्माण झाली आहे. रविवारी शाळा, कॉलेज बंद आहेत. मात्र सोमवारी शाळा, कॉलेज सुरू होणार असल्याने विद्यार्थ्यांना या भटक्या कुत्र्यांपासून मोठा धोका संभवतो. त्यामुळे नगरपंचायतीने याबाबत तातडीने कारवाई करावी अशी मागणी नागरिकांकडून आता जोर धरत आहे.