(लांजा)
लांजा शहरातील तेलीवाडी (लांजेकर चाळ) येथे भाड्याने राहत असलेली विद्या विजय शिनगारे (वय ३१) ही विवाहित महिला दोन मुलांसह बेपत्ता झाली आहे. या प्रकरणी पतीने लांजा पोलीस ठाण्यात पत्नी बेपत्ता झाल्याची फिर्याद दाखल केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहीतीनुसार, विजय शांताराम शिनगारे (वय ३४, मुळ राहणार गोळवशी, ता.लांजा) हे सध्या लांजा शहरातील तेलीवाडी येथील लांजेकर चाळीत पत्नी व दोन मुलांसह भाड्याने रहात होते. विजय शिनगारे हे शेतात लावणी लावण्याच्या निमित्ताने आपल्या मुळ गावी गोळवशी येथे गेले असता शुक्रवार दि.२८ जुलै ते शनिवार दि.२९ जुलै रोजी दरम्यान सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास त्याची पत्नी विद्या विजय शिनगारे, मुलगी वेदिका विजय शिनगारे (वय १०) व मुलगा विराज विजय शिनगारे (वय ५) यांना दोघांना सोबत घेऊन तेलीवाडी येथील भाड्याच्या खोलीतून आजूबाजूला कोणाला काही न सांगता निघून गेली.
पती विजय शांताराम शिनगारे (वय ३४) यांनी याबाबत भाड्याने राहत असलेल्या खोलीच्या आजूबाजूतील परिसरात तिचा शोध घेतला. तसेच नातेवाईकांकडे चौकशी करून, सर्वत्र शोध घेऊनही ८ दिवसानंतर पत्नीचा काहीच थांगपत्ता लागत नसल्याने अखेर विजय शिनगारे यांनी सोमवार दि.७ ऑगस्ट रोजी लांजा पोलीस ठाण्यात पत्नी विद्या शिनगारे बेपत्ता झाल्याची फिर्याद दाखल केली आहे.
सदर विवाहिता व तिची दोन मुले कोणाच्या निदर्शनास आल्यास त्यांनी पोलीस ठाण्याशी संपर्क साधण्याचे आवाहन लांजा पोलीसांच्यावतीने करण्यात आले आहे. याबाबत अधिक तपास लांजा पोलीस उपनिरीक्षक प्रवीण देसाई करत आहेत.