( लांजा / प्रतिनिधी )
तालुक्यातील माचाळ येथे एका शेतकऱ्यावर आज दुपारी ३ च्या सुमारास गवा रेड्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीररित्या जखमी झाल्याची घटना घडली आहे. गवा रड्याने एवढ्या जोरदार हल्ला केला आहे की शेतकऱ्याच्या पोटातील आतडे बाहेर आले आहे. त्याला अत्यवस्थ अवस्थेत उपचाराकरिता रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले आहे.
याबाबत घटना अशी की, भिकाजी राघव मांडवकर (रा. माचाळ, वय ६५) हे आपल्या शेतात दुपारच्या सुमारास काम करीत असताना ही घटना घडली. त्यावेळी अचानक त्या ठिकाणी गवारेडा त्यांच्यासमोर आला. गवारेडा समोर बघताच ते घाबरले. त्यांनी तेथून बाजूला होण्याचा प्रयत्न केला. यावेळी गवा रेड्याने सरळ त्यांच्यावर हल्ला केला. या हल्ल्यानंतर या शेतकऱ्याचे पोटातील आतडे बाहेर आले. आजूबाजूला असलेले काही शेतकरी देखील हा प्रकार पाहत होते. त्यांनी त्याला हटविण्यासाठी आटोकाट प्रयत्न केला. मात्र तोपर्यंत गवारेड्याने भिकाजी मांडवकर यांच्या पोटात शिंगे खुपसून गंभीर जखमी केले. पोटातील आतडे बाहेर आले. काही वेळानंतर गवारेडा जंगलात पसार झाला. ही घटना कळताच लांजा वनविभाग तसेच स्थानिक लोकांनी ॲम्बुलन्सची व्यवस्था केली. त्यांना तात्काळ उपचाराकरिता शिपोशी येथे आणण्यात आले. त्यानंतर पुढील उपचाराकरिता जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. सद्यस्थितीत त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. त्यामुळे आता लांजा तालुक्यातील पूर्व भागात शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
तालुक्याच्या सह्याद्रीच्या माथ्यावर वसलेल्या माचाळ या अतिदुर्गम गावात वन्य प्राण्यांचा वावर नेहमीच असतो. माचाळ हे सह्याद्री माथ्यावर वसलेले जिल्ह्यातील सर्वात उंचीवरचे गाव आहे. याठिकाणी ही घटना घडल्याने तात्काळ उपचाराला अनेक अडचणी आल्या. मात्र स्थानिक ग्रामस्थ आणि यांच्या मदतीने त्यांना जिल्हा रुग्णालयात आणण्यात आले.