लांजा तालुक्यातील प्रभानवल्लीतील गणेशखोरी येथे डोंगरपठारावर श्री बल्लाळ गणेशाचे मंदिर आहे. येथे असलेले पुरातन मुळ गणेश मंदिर सुमारे 300-400 वर्षापूर्वी परकियांच्या आक्रमणात निष्ट झाले असावे. काही वर्षांपूर्वी प. पु. रामचंद्र वा. देसाई महाराज या सत्पुरुषाने या गणपतीचा शोध लावला.
त्यांना स्वामी समर्थांच्या मंदिरात झालेल्या ‘बल्लाळ गणेश रुपात मुचकुंदी ऋषींच्या तपोवनात मी वास्तव्यास आहे, माझा जिर्णोध्दार कर‘ असा दृष्टान्त झाला. या दृष्टांतानंतर ते 10-12 वर्षे या गणपतीच्या शोधात फिरत-फिरत प्रभानवल्ली येथे आले. मार्गशिर्ष कृ. एकादशी-द्वादशीला ग्रामस्थ व शिष्यांच्या मदतीने झाडेझुडपे तोडून शोध घेत असताना गणेशखोरी या ठिकाणी काळ्यापाषाणातील गणेशाची भग्नमुर्ती व अवशेष सापडले. देसाई महाराजांच्याच पुढाकाराने ग्रामस्थ व शिष्यगणांच्या योगदानातून येथे श्री बल्लाळ गणेशाचे सुंदर मंदिर उभे राहिले आहे. येथे सापडलेली श्री बल्लाळ गणेशाची मुळ मुर्ती व प्रतिष्ठापना केलेली नवीन मुर्ती पहायला मिळते.
श्री बल्लाळ गणेशाचा प्रकटदिन म्हणून मार्गशिर्ष कृष्ण एकादशी ते त्रयोदशी असे तीन दिवस मोठा उत्सव येथे साजरा केला जातो. त्यातील त्रयोदशी हा उत्सवाचा मुख्य दिवस असतो. या उत्सवाला रत्नागिरी, सिंधुदूर्ग, सांगली, कोल्हापूर, मुंबई मधील देसाई महाराजांचे शिष्यगण व गणेशभक्त मोठ्या संख्येने येतात. श्री बल्लाळ गणेशाला त्यादिवशी दाखविला जाणारा नैवेद्य हा तेथील मुस्लिम भक्ताच्या घरात केला जातो हे विशेष आहे. देसाई महाराजांच्या पश्चात सध्या येथील मंदिर ट्रस्ट उत्सवाचे नियोजन करते. अंगारकी संकष्टी, गणेश जयंती या दिवशीही येथे येणार्या गणेशभक्तांची संख्या बर्यापैकी असते. नवसाला पावणारा व इच्छापूर्ती करणारा श्री बल्लाळ गणेश असल्याची अनेक भक्तांची श्रद्धा आहे.
तुम्ही गणेशभक्त असल तर किंवा भक्तीमार्गातील लोकांनी एकदातरी गर्द वनराईतील या मंदिराला आवर्जून भेट दयायला हवीच. या मंदिराबरोबरच जवळच असणार्या मुचकुंदी ऋषींची गुहा असलेल्या माचाळ या थंड हवेच्या ठिकाणाला तुम्ही भेट देऊ शकता. प्रभानवल्लीला जाताना वाटेत चहा-नाष्टा करीता भांबेड येथे हॉटेल्स आहेत. परंतु राहण्याची व्यवस्था नाही.
येथे कोल्हापूरहून यायचे झाल्यास कोल्हापूर-रत्नागिरी मार्गावरिल साखरपा सोडल्यानंतर दाभोळे या गावापासून प्रभानवल्ली 30 किलोमिटरवर आहे. मुंबईहून आल्यास मुंबई गोवा महामार्गावरील लांजा येथून हे ठिकाण 32 किलोमिटर आहे. सिंधुदूर्ग जिल्ह्यातून आल्यास मुबई-गोवा महामार्गावरील वाटूळ येथून 25 किलोमिटरवर हे मंदिर आहे. मुंबई किंवा गोव्यातून कोकण रेल्वेने यायचे झाल्यास विलवडे या स्थानकापासून 20 किलोमिटरवर हे मंदिर आहे.