( लांजा )
लांजा शहरानजीकच्या धुंदरे गावात बिबट्याने केलेल्या हल्ल्यात पाड्याचा मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी २४ मार्च रोजी घडली आहे. ही घटना धुंदरे येथील डॉक्टर तिरमारे यांच्या शेती फार्ममध्ये सकाळी घडली.
गेल्या काही दिवसांपासून लांजा शहरा नजीकच्या धुंदरे वांजूदेवी मंदिर परिसरात बिबट्याचा मुक्त संचार सुरू आहे. या परिसरात फिरणाऱ्या बिबट्याला अनेक ग्रामस्थांनी देखील दिवसाढवळ्याही पाहिले आहे. शुक्रवारी सकाळी धुंदरे येथील रवींद्र पालकर यांची गुरे रानात चरावयास सोडली होती. त्यापैकी एका पाड्यावर बिबट्याने हल्ला केला. धुंदरे येथील डॉ. तीरमारे यांच्या शेती फार्ममध्ये केलेल्या या हल्ल्यात हा पाडा मृत्यूमुखी पडला आहे.
याबाबतची माहिती मिळाल्यानंतर लांजा वनविभागाचे वनपाल दिलीप आरेकर तसेच स्थानिक नगरपंचायत नगरसेवक राजू हळदणकर, पोलीस पाटील विकास करंबेळे, डॉक्टर तिरमारे आणि रवींद्र पालकर मालक यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. वनखात्याकडून या घटनेचा पंचनामा देखील करण्यात आला आहे. दरम्यान बिबट्याच्या या मुक्त संचारमुळे धुंदरे वांजुदेवी परिसरातील ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. नरभक्षक झालेल्या या बिबट्याला आता सापळा लावून ताब्यात घ्यावा अशी स्थानिकांनी मागणी केली आहे.