(लांजा / वार्ताहर)
पत्नीच्या चारित्र्याच्या संशयाचे भूत डोक्यात बसल्याने तिला व सहा वर्षाच्या मुलाला ठार करणाऱ्या संदेश चांदिवडेने अटकेनंतर काही धक्कादायक गोष्टी कबुल केल्या आहेत. आपले संपूर्ण कुटुंब संपवून आपण आत्महत्या करण्याच्या विचारात होतो, असे त्याने पोलिसांना सांगतले. शुक्रवारी त्याला न्यायालयाने ७ दिवसाची पोलिस कोठडी सुनावली आहे.
लांजा तालुक्यातील कोट पाष्टेवाडी येथील दुहेरी हत्याकांडाने जिल्हा हादरला आहे. वीज मीटर रिडींग व बिलांचे वाटप करणारा संदेश रघुनाथ चांदिवडे (३५) शांत स्वभावाचा सांगतात. त्याला कोणतेही व्यसन नव्हते. आपले काम व कुटुंब एवढेच त्याचे आयुष्य होते. कामाच्या व्यापामुळे कुठे जाणे येणे नसल्याने त्याला जवळचे मित्रही नव्हते. असल्याचे ग्रामस्थ संदेशचे २०१६ मध्ये सांगली येथील सोनाली हिच्याबरोबर लग्न झाले.
कामाच्या दृष्टीने सोयीचे म्हणून तो शहरातल डाफळेवाडीत राहत होता. त्यांना प्रणव व पियुष असे दोन मुलगे झाले. मात्र अचानक १९ जुलै रोजी सोनाली काहीही न सांगता आपल्या मुलांना घरीच सोडून निघून गेली. त्याचा राग त्याच्या डोक्यात होता. तब्बल दहा दिवसांनी ती लांजातच सापडल्यानंतर त्याने लांजा डाफळेवाडी येथील खोली सोडून कोट गावी जाण्याचा निर्णय घेतला. दि. २९ जुलै रोजीच तो बायकोमुलांसह गावी गेला. पत्नी दहा दिवस बाहेर राहिल्याने त्याच्या मनामध्ये संशयाचे काहुर माजले होते. त्यावरुन त्यांच्यामध्ये कुरबुरी वाढल्या होत्या.
लांजा येथील खोलीवर राहिलेल्या वस्तू घेऊन येते, असे सोनालीने गुरुवारी पहाटे संदेशला सांगितले. मीही तुझ्यासोबत येतो असे संदेशने म्हटल्यावर मात्र तुम्ही नको, मी एकटी जाते, असे ती म्हणाली. त्यावरून त्यांच्यामध्ये शाब्दिक वाद झाला. जर ती आता एकटी बाहेर गेली तर पुन्हा येणे अशक्य असल्याचे संदेशला वाटले. आधीच मनात दाबून ठेवलेला राग आणि त्यात हा नवा वाद यामुळे संदेश प्रचंड संतापाने पेटून उठला. पहाटे ४.३० वाजण्याच्या सुमारास सोनाली घराबाहेर असलेल्या चुलीवर अंघोळीचे पाणी तापवण्यासाठी गेली. तेव्हाच संदेशने धारदार कोयत्याने तिच्यावर वार केला. वार वर्मी लागल्याने सोनाली जागेवरच कोसळली. त्यानंतरही संदेशने दोनदा कोयत्याने मानेवर वार केले. सोनाली ठार झाल्यानंतर मोठा मुलगा प्रणव याला उशी तोंडावर दाबून संदेशने त्यालाही मारले. मात्र त्याला मारल्यानंतर तो थोडा भानावर आला. त्यामुळे आपली आई व तिच्या कुशीत झोपलेला आपला लहान मुलगा पियुष यांना काहीच न करता तो घरातून बाहेर पडला. त्याच्या भानावर येण्यामुळे दोन जीव वाचले.
सोनाली याअगोदरही मुलांना सोडून झाली होती गायब….
सोनाली आणि संदेश यांचा विवाह २०१६ मध्ये झाला होता. सोनाली ही सोशल मीडियावर अँक्टिव्ह असायची. यातून सून सासू आणि नवरा यांच्यात वारंवार खटके उडायचे. या सगळ्या गोष्टींची माहिती तिच्या माहेरीदेखील संदेशने दिली होती. त्यानंतर जुलै महिन्यात संदेश पत्नी सोनाली आणि मुलांसह लांजा येथे राहायला आला होता. १९ जुलैला सोनाली नवऱ्याला चिठ्ठी लिहून मुलांना सोडून गायब झाली होती. त्यानंतर संदेशने पत्नी बेपत्ता झाल्याची फिर्याद लांजा पोलिस ठाण्यात दाखल केली होती. २९ जुलैला सोनालीने पुन्हा नवरा संदेशला फोन करून मला तुझ्याकडे राहायला यायचे आहे, असे सांगितले होते. त्यानंतर संदेश सोनालीला घेऊन लांजा पोलिस ठाण्यात गेला होता. पोलिसांनी या दोघांचे समुपदेशन करून त्यांना घरी पाठवले होते.