(लांजा)
लांजा तालुकास्तरीय हिवाळी शालेय क्रीडा स्पर्धा कोंडये नं. १ च्या क्रीडांगणावर संपन्न झाल्या. यामध्ये शिपोशी, भांबेड, लांजा आणि पुणस प्रभागातील अनेक शाळांमधील खेळाडूंचा समावेश होता. यावेळी शिपोशी बीटातील सर्वच खेळाडूंनी चांगला खेळ दाखवत चालू वर्षाची जनरल चॅम्पियनशिप स्वतःकडे खेचून घेतली. यामध्ये जिल्हा परिषद शाळा देवधे नं. ३ मणचेच्या बहुसंख्य विद्यार्थ्यांचा समावेश होता. यावेळी हा जनरल चॅम्पियनशिपचा चषक गट शिक्षणाधिकारी बंडगर यांनी शिपोशी बीटातील खेळाडूंकडे सुपूर्त केला.
या सर्व प्रभागातील विजेत्या खेळाडूंच्या तालुका स्तरीय क्रीडा स्पर्धा मध्ये शिपोशी बीटाचे प्रतिनिधित्व करीत असताना मंचेकर वाडी शाळेमधील विद्यार्थ्यांनी लहान गट मुली खो-खो, लहान गट मुली कबड्डी आणि लहान गट मुली लंगडी आदी खेळ प्रकारामध्ये विजय संपादन केला असून सर्व खेळाडू जिल्हा स्तरीय क्रीडा स्पर्धेसाठी पात्र ठरले आहेत. त्याचप्रमाणे वैयक्तिक क्रीडा प्रकारात सोहम रवींद्र खेगडे याने धावणे व लांब उडी मध्ये प्रथम क्रमांक पटकावला असून जिल्हा स्तरावर लांजा तालुक्याचे प्रतिनिधित्व करणार आहेत.
या सर्व विद्यार्थ्यांना शाळेचे मुख्याध्यापक श्री संतोष जाधव, श्री नंदकुमार पाटोळे, श्री नानासाहेब गोरड व सौ सायली तिखे मॅडम यांनी मार्गदर्शन केले. मिळवलेल्या यशाबद्दल रत्नागिरी जिल्हा परिषद शिक्षण समिती सभापती श्री चंद्रकांतजी मंचेकर व शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी कौतुक केले आहे.