( प्रतिनिधी / लांजा )
सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रात नेहमी पुढाकार घेणारे वेरवली पंचक्रोशी शिक्षण मंडळाचे सदस्य शैलेश रमेश डोळस यांनी ग्रामीण भागातील होतकरू विद्यार्थ्यांची शैक्षणिक गरज ओळखुन श्रीराम विद्यालय वेरवली बुद्रुकच्या १० विद्यार्थ्यांना सायकलीचे वाटप केले.
वेरवली पंचक्रोशी शिक्षण मंडळाच्या श्रीराम विद्यालय वेरवली बुद्रुक मध्ये ग्रामीण भागातून विद्यार्थी शिक्षणासाठी येत असतात. अनेक विद्यार्थी पायी प्रवास करत आहेत. त्यामुळे विध्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये व विधर्थ्यांना शाळेत लवकर येता यावे ही विद्यार्थ्यांची अडचण लक्षात घेऊन शैलेश डोळस यांनी शाळेतील १० विद्यार्थ्यांना सायकल दिल्या. हा सायकल वितरणाचा कार्यक्रम नुकताच शाळेच्या सभागृहामध्ये संपन्न झाला.
या कार्यक्रमाप्रसंगी वेरवली शिक्षण मंडळाचे सचिव संतोष पडवणकर, कार्याध्यक्ष सुभाष राणे, शालेय समिती अध्यक्ष सदाशिव पाध्ये, मुख्याध्यापिका श्रद्धा गांगण आदी प्रमुख उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सचिन कांबळे, आभार प्रदीप लाड यांनी मानले.