( लांजा )
घरात कोणी नसल्याचा फायदा उठवत अज्ञात चोरट्याने बंगल्याच्या मुख्य दरवाजाचे कुलूप तोडून आतील रोख रक्कम, सोन्याची दागिने व अन्य साहित्य असे मिळून एकूण ७२ हजार रुपयांच्या ऐवजावर डल्ला मारला आहे. तालुक्यातील देवधे खालची सावंतवाडी येथे घटना घडली असून याप्रकरणी लांजा पोलीस ठाण्यात मंगळवारी ७ मार्च रोजी रात्री उशिरा अज्ञात चोरट्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तालुक्यातील देवधे गावात खालची सावंतवाडी येथे सोनाली नारायण करंबेळे यांचा बंगला आहे. सोनाली करंबेळे या दिनांक १ आणि २ मार्च रोजी मुंबईत आपल्या मुलाकडे गेल्या होत्या. त्यामुळे घरात कोणी नसल्याचा फायदा उठवत अज्ञात चोरट्याने बंगल्याचा मुख्य दरवाजाचे कुलूप तोडून घरामध्ये प्रवेश केला. घरातील रोख रुपये ४६,५०० तसेच ५ ग्रॅम वजनाचे सोन्याचे प्लेन रिंगा, ३ ग्रॅम वजनाचे चांदीचे कॉईन असा एकूण ७२ हजार रुपये किंमतीचे ऐवज अज्ञात चोरट्यांनी लंपास केले आहे.
याप्रकरणी मंगळवारी ७ मार्च रोजी उशिरा लांजा पोलीस ठाण्यात त्यांनी फिर्याद दाखल केली असून लांजा पोलिसांनी रात्री उशिरा अज्ञात चोरट्यावर चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. याबाबत अधिक तपास लांजा पोलीस करत आहेत.