( लांजा / प्रतिनिधी )
लांजा येथे काही दिवसापूर्वी गवा रेड्याच्या हल्ल्यात शेतकरी जखमी झाल्याची घटना घडली होती. या घटनेत शेतकरी गंभीर जखमी झाला होता. त्यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र त्यांचा उपचार सुरू असताना आज मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे.
लांजमधील माचाळ येथील शेतकरी भिकाजी राघू मांडवकर (वय ६५) हे ९ ऑक्टोबर रोजी आपल्या शेतात दुपारच्या वेळेस काम करताना गवा रेड्याने अचानक हल्ला केला होता. या हल्ल्यात मांडवकरांच्या पोटात गवा रेड्याने शिंगे खुपसल्याने आतडे बाहेर आले होते. त्यावेळी प्राथमिक आरोग्य केंद्र लांजा येथे प्रथमोपचार करून त्यांना अत्यवस्थ अवस्थेत पुढील उपचाराकरिता रत्नागिरी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
दरम्यान, मांडवकर यांच्यावर जिल्हा शासकीय रुग्णालय येथे शस्त्रक्रिया करण्यात आली होती. १७ ऑक्टोबर पर्यंत त्यांची तब्बेत स्थिर होती. त्यानंतर त्यांची तब्बेत बिघडल्याने त्यांच्यावर पुन्हा शस्त्रक्रिया करण्यात आली होती. परंतु मंगळवार १८ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ४.३० वाजण्याचा सुमारास त्यांचा उपचारावेळी दुर्दैवी मृत्यु झाला. हल्ल्यात मृत झालेल्या भिकाजी मांडवकर यांच्या कुटुंबियांना लवकरच शासकीय सानुग्रह अनुदान देण्यात येईल असे परिक्षेत्र वन अधिकारी प्रकाश सुतार यांनी सांगितले.