(लांजा)
क्षुल्लक कारणावरून शिवीगाळ व दमदाटी करत चुलत भावाच्या डोक्यात लाकडी काठी मारल्याची घटना कोंड्ये-रांबाडेवाडी (ता. लांजा) येथे शनिवारी रात्री घडली. या मारहाणीत समीर पांडुरंग पंडित (५३) हे जखमी झाले. या प्रकरणी मिलिंद मुकुंद पंडित (५१) याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कोंड्ये-रांबाडेवाडी येथील समीर पंडित आणि त्यांचा चुलत भाऊ मिलिंद पंडित यांच्यामध्ये घरगुती वाद सुरू आहे. मिलिंद हा शनिवारी दारू पिऊन समीर पंडित यांना शिवीगाळ करीत होता. याबाबत स्मिता मोरेश्वर पाध्ये यांनी मेसेज करून माहिती दिली. त्यानंतर समीर पंडित यांनी लांजा पोलिसांच्या ११२ नंबरवर कॉल करून माहिती दिली.
तसेच रात्री ८:१५ वाजण्याच्या दरम्यान घरी जाऊन मिलिंद याला जाब विचारला. त्यावेळी अंधारात लपवून ठेवलेल्या लाकडी काठीने समीर यांच्या डोक्यात प्रहार केला. यामध्ये त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे. दोघांचे भांडण मिटविण्यासाठी स्मिता पाध्ये या पुढे आल्या. त्यावेळी त्यांच्या उजव्या हातावर काठीचा मार बसला. याप्रकरणी लांजा पोलिस स्थानकात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. अधिक तपास पोलिस हेडकॉन्स्टेबल राजेंद्र कांबळे करीत आहेत