( लांजा/ प्रतिनिधी )
लांजातील रावारी ब्राह्मणवाडी येथील भाजपचे ज्येष्ठ कार्यकर्ते व तालुक्यातील एक अभ्यासू व्यक्तिमत्व असलेले प्रसन्न दिक्षीत (५० वर्षे) हे १२ ऑगस्ट पासून बेपत्ता होते. त्यांच्या बेपत्ता होण्याने अनेक तर्क वितर्क काढले जात असताना आज सोमवारी त्यांच्या मृतदेह जंगलात गळफास घेतलेल्या स्थितीत आढळून आला. या घटनेने लांजा तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.
प्रसन्न दीक्षित हे शुक्रवारी १२ ऑगस्ट रोजी सकाळी ८ वाजता कोणालाही न सांगता घरातून निघून गेले होते. त्यांनी आपला मोबाईल देखील घरातच ठेवला होता. त्यामुळे घरातील लोकांना त्यांच्याशी संपर्क साधता येत नव्हता. गावातील ग्रामस्थ आणि त्यांचे कुटुंबीय यांनी रावारी पंचक्रोशी तसेच नातेवाईकांकडे शोध घेतला. यांचा कुठेही ठावठिकाणा लागलेला नाही.
याबाबत शनिवारी १३ ऑगस्ट रोजी लांजा पोलिस ठाण्यात बेपत्ता म्हणुन फिर्याद दाखल करण्यात आली होती. त्यानंतर आज २२ ऑगस्ट रोजी तब्बल १० दिवसांनी त्यांचा मृतदेह गावातील एका जंगलात गळफास घेतलेल्या स्थितीत आढलून आला. पोलिस घटना स्थळी दाखल झाले आहेत.