(लांजा)
गांजा सेवन करणाऱ्यांविरोधात लांजा पोलिसांनी धडक कारवाई करत शुक्रवारी शहरातील चिंतामणी हॉस्पिटल परिसरातील मोकळ्या जागेत कंम्पाउंड मध्ये गांजा ओढत असलेल्या चौघांच्या मुसक्या आवळल्या होत्या. या प्रकरणी आता लांजा पोलिसांनी चिपळूण मधून आणखी दोघांना अटक केली आहे.
याबाबत सविस्तर माहीती अशी की, लांजा शहरातील चिंतामणी हॉस्पिटलच्या मागील बाजूस चिरेबंदी कंम्पाउंड मध्ये असलेल्या मोकळ्या जागेत अंमली पदार्थाचे सेवन चालू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्या माहितीवरून पोलिसांनी शुक्रवारी १२ मे रोजी त्या ठिकाणी धाड टाकल्यानंतर सदर ठिकाणी ४ जण गांजा ओढताना सापडले होते.
याप्रकरणी लांजा पोलिसांनी तपासाची चक्रे जलगतीने फिरवल्यानंतर धागे दोरे हाताला लागल्याने चिपळूण येथे जाऊन राकेश भगवान गोरीवले (वय ३१, रा.चिपळूण) व सचिन जयवंत चव्हाण (वय ३२, रा.चिपळूण) यांना ताब्यात घेऊन अटक केली आहे. त्या दोघांना न्यायालयाने दि.१६ मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावली असून याबाबत अधिक तपास पोलीस निरीक्षक दादासाहेब घुटूकडे करीत आहेत.