(धुळे)
धुळ्याच्या शिरपूर तालुक्यातील वाघाडी गावचे रहिवासी आणि लष्करातील लान्स नायक मनोज संजय माळी यांना (२५) गुरुवारी सकाळी वीरमरण आले. सिक्कीममध्ये कर्तव्य बजावत असताना संजय माळी यांचा अपघाती मृत्यू झाला.
मनोज हे २४ मार्च २०१९ रोजी भारतीय लष्कारात भरती झाले होते. गुरुवारी सकाळी सिक्किममध्ये माळी उंच डोंगररांगांवर सीमेचे रक्षण करण्यासाठी तैनात होते. यावेळी पाय घसरल्याने ते ६०० फूट खोल दरीत कोसळले. लष्कराच्या जवानांनी तातडीने मनोज यांचा शोध सुरू केला. त्यानंतर दुपारी साडेबारा वाजता माळी यांचा मृतदेह मिळाला. माळी यांचे पार्थिव सिक्किमच्या लष्करी रुग्णालयात नेण्यात आले.
दरम्यान, या घटनेची माहिती आज दुपारी वाघाडी (ता. शिरपूर जि.धुळे) येथे कुटुंबीयांना कळवण्यात आली. तरुण मुलाच्या मृत्यूने माळी कुटुंबीयांवर दुःखाचा अक्षरशः डोंगर कोसळला. हे वृत्त गावात वाऱ्यासारखे पसरले आणि अवघे गाव माळी कुटुंबीयांना धीर देण्यासाठी एकत्र आले. लान्स नायक मनोज माळी यांच पार्थिव आज वाघाडी गावात आणले जाणार असल्याची माहिती गावकऱ्यांनी दिली आहे.