(मुंबई)
मी लवकरच क्रांतिकारी निर्णय घेणार आहे, असे वक्तव्य विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी बुधवारी केले. १६ आमदारांच्या अपात्रेबाबत राहुल नार्वेकर यांना निर्णय घ्यायचा आहे. या १६ आमदारांमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदेही आहेत. नार्वेकर यांनी केलेल्या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले असून अनेकांचे डोळे विस्फारले आहेत
विधानसभेत आयोजित एका कार्यक्रमात राहुल नार्वेकर यांनी हे वक्तव्य केले. सर्वात तरुण विधानसभा अध्यक्ष म्हणून माझी ओळख करुन देण्यात आली. म्हणजे माझे वय किती आहे याचा अंदाज सर्वांना आलाच असेल. माझा जन्म १९७७ सालचा आहे. त्याच वर्षी बाळासाहेब देसाई यांनी अध्यक्ष करण्यात आले. त्यांनी त्यांच्या राजकीय कारकिर्दीत क्रांतिकारी निर्णय घेतले. त्यांचा आदर्श ठेवून मीही लवकरच क्रांतिकारी निर्णय घेणार आहे, असे वक्तव्य राहुल नार्वेकर यांनी केले. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा सुरु झाल्या आहेत. शिंदे सरकार कोसळणार की राहणार याचे तर्क लावले जात आहेत.
गेल्या वर्षी २० जून रोजी विधान परिषदेची निवडणूक पार पडताच एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंड केले. उद्धव ठाकरे यांनी पक्षातील बंड मोडून काढण्यासाठी सर्व कायदेशीर मार्गांचा अवलंब केला. त्यात विधिमंडळ पक्षनेते आणि मुख्य प्रतोद बदलले. त्यानंतर एकनाथ शिंदे यांच्यसह १६ आमदारांना अपात्र ठरविण्याची प्रक्रिया सुरू केली. यादरम्यान शिवसेनेतील ३९ आमदार शिंदे गटात सामील झाले. राज्यपालांच्या विश्वासदर्शक ठरावाच्या सूचनेला शिवसेनेच्या ठाकरे गटाने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले, मात्र न्यायालयाने ही याचिका फेटाळून लावल्याने उद्धव ठाकरे यांनी विधानसभेत विश्वासदर्शक ठरावाला सामोरे जाण्याचे टाळून मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर शिवसेनेने या सर्व घटनांना सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले. सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या पाच न्यायाधीशांच्या घटनापीठाने यावर निकाल दिला. विधानसभा अध्यक्षांनी १६ आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय घ्यावा. हा निर्णय घेताना शिवसेना फुटी आधी पक्षप्रमुख कोण होता त्याचा व्हिप ग्राह्य धरावा. २०१९ साली निवडणूक आयोगासमोर सादर झालेली घटना समोर ठेवून निर्णय घ्यावा, असे आदेश न्यायालयाने दिले आहेत. न्यायालयाने गटनेते पदी एकनाथ शिंदे यांची तर प्रतोद म्हणून भरत गोगावले यांची केलेली निवडही रद्द केली आहे. त्यामुळे राहुल नार्वेकर काय क्रांतिकारी निर्णय घेणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.
सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचं स्वागत करत विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सगळ्या बाबींचा विचार करत लवकरात लवकर निर्णय घेणार असल्याचं गेल्या महिन्यात सांगितलं होतं. हा निर्णय घेत असताना दिरंगाई करणार नाही परंतु निर्णय घाईघाईत घेणार नाही. 16 आमदारांच्या अपात्रतेबाबतचा निर्णय हा नि:पक्षपातीपणे होईल, असं नार्वेकर यांनी स्पष्ट केलं होतं.