(आरोग्य)
शरीरात उद्भवणारे रोग किंवा समस्या लक्षणांवरून ओळखल्या जातात. आपण जे काही खातो, पचवतो किंवा जी काही जैवरासायनिक प्रक्रिया आपल्या शरीरात घडते, त्यातून बाहेर पडणारे टाकाऊ पदार्थ किडनीद्वारे फिल्टर केले जातात आणि मूत्राद्वारे बाहेर टाकले जातात. आपण किती निरोगी आहोत हे लघवीच्या रंगावरून ठरवता येते. तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार हा आरोग्य तपासण्याचाही एक मार्ग आहे. शरीरात काही समस्या असतील तर लघवीचा रंग बदलतो. रंग, वास या आधारावरून तुम्ही निरोगी आहात कि कोणत्या आजाराने ग्रस्त आहात हे शोधता येते. पुरेशा प्रमाणात पाणी प्यायल्याने लघवीचा रंग सामान्य राहतो. जर कमी पाणी प्यायले गेले तर साहजिकच लघवीचा रंग बदलतो. लघवीचा रंग कोणत्या आजाराचे लक्षण असू शकते हे जाणून घेणे गरजचे आहे.
कमी पाणी प्यायल्याने डिहायड्रेशन होते. अशा परिस्थितीत, हानिकारक रसायने आपल्या मूत्रपिंडात जमा होतात आणि पाण्याच्या कमतरतेमुळे ते शरीरातून बाहेर पडू शकत नाहीत. त्यामुळे किडनीशी संबंधित अनेक समस्या उद्भवतात. आपल्या शरीरात सुरू असलेल्या प्रक्रिया समजून घेण्यासाठी मूत्राचा रंग हा एक अतिशय महत्त्वाचा मार्ग आहे. युरोक्रोम या रसायनामुळे लघवीला रंग येतो. युरोक्रोम हे नैसर्गिकरित्या उद्भवणारे पिवळे रंगद्रव्य आहे. यामुळे, मूत्र सामान्यतः पिवळ्या रंगाचे आणि जवळजवळ पारदर्शक असते.
तुमच्या त्वचेच्या आणि नखांच्या रंगावरूनही अनेक रोग ओळखले जातात. त्याचप्रमाणे तुमच्या लघवीचा रंगही तुमच्या आरोग्याशी संबंधित अनेक माहिती देऊ शकतो. शरीरातीलअतिरिक्त पाणी आणि टाकाऊ पदार्थ मूत्रपिंडांद्वारे काढून टाकणे हे मूत्राचे कार्य आहे. जर तुम्हाला सतत लघवीच्या रंगात अनपेक्षित बदल दिसत असेल तर ते एखाद्या आजाराचे लक्षण असू शकते. आपल्या लघवीच्या रंगात कधी बदल झाल्याचे तुमच्या लक्षात आले असेल, तर त्यामागे अनेक कारणे असू शकतात. यासोबतच शरीरातील अनेक आजार ओळखण्यासाठी डॉक्टरांकडून लघवीची चाचणी केली जाते.
1. हलका पिवळा लघवीचा रंग :-
जर तुमच्या लघवीचा रंग हलका पिवळा असेल, तर तुमचे शरीर व्यवस्थित काम करत आहे आणि तुम्ही निरोगी आहात. तसेच पुरेसे पाणी प्यायल्याने लघवीचा रंग हलका पिवळा होतो.
2. गडद पिवळा लघवीचा रंग:-
ज्या व्यक्तीच्या लघवीचा रंग गडद पिवळा असेल तर ते शरीरात पाण्याची कमतरता दर्शवते. याचा अर्थ असा आहे की तुमचे शरीर निर्जलीकरण झाले आहे आणि तुम्हाला पुरेसे पाणी पिणे आणि द्रवपदार्थांचे सेवन करणे आवश्यक आहे. याशिवाय काही वेळा औषधांच्या वापरामुळे लघवीचा रंग गडद पिवळा होतो. मात्र ही समस्या कायम राहिल्यास डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्या.
3. लाल किंवा गुलाबी लघवीचा रंग :-
गाजर, बीटरूट, बेरी इत्यादींच्या सेवनामुळे कधीकधी तुमच्या लघवीचा रंग लाल किंवा गुलाबी असू शकतो. पण अनेकदा ही समस्या कायम राहते, मग ते एखाद्या आजाराचे लक्षण असू शकते. मुळात, मूत्राचा लाल रंग त्यामध्ये रक्ताची उपस्थिती दर्शवतो. आणि यामागील कारण म्हणजे मूत्राशय किंवा मूत्रपिंडात ट्यूमर स्टोन किंवा वाढलेली प्रोस्टेट असू शकते. मात्र अनेकवेळा जेव्हा तुम्ही गडद लाल आणि गुलाबी रंगाचे पदार्थ खाता तेव्हा लघवीचा तसा रंग येतो.
4. दुधाळ पांढर्या लघवीचा रंग :-
दुधाळ पांढर्या रंगाचे लघवी हे शरीरातील मूत्रसंसर्ग किंवा किडनी स्टोनचे लक्षण असू शकते. या प्रकरणात, डॉक्टरांना भेटणे आवश्यक आहे.
5. पारदर्शक लघवीचा रंग :-
लघवीचा रंग पारदर्शक असण्याचे कारण तुमच्या शरीरातील जास्त पाणी हे देखील असू शकते. शरीराला हायड्रेट आणि निरोगी ठेवण्यासाठी पुरेसे पाणी पिणे आवश्यक असले तरी, जास्त पाणी पिल्याने शरीरातील इलेक्ट्रोलाइट्स धुऊन जातात. पण कधी कधी असे घडते तेव्हा काळजी करण्याची गरज नाही.
6. हिरवा रंग :-
लघवीचा निळा आणि हिरवा रंग तुम्ही काही खाल्ल्याने असू शकतो. मिथिलीन ब्लू नावाचा रंग अनेक कँडीज तसेच काही औषधांमध्ये वापरतात. त्यामुळे तुमच्या लघवीचा रंग निळा दिसू शकतो. पण, काही वेळा या रंगाची लघवी मूत्रपिंड आणि मूत्राशयाशी संबंधित त्रास दर्शवतो. स्यूडोमोनास एरुगिनोसा बॅक्टेरियाच्या संसर्गामुळे तुमचा लघवी निळा, हिरवा किंवा जांभळा रंग दिसू शकतो.
टीप : वरील माहिती सर्वसामान्य ज्ञानावर आधारित आहे, तब्बेतीबाबत काही त्रास अथवा लक्षणे जाणवत असल्यास डॉक्टरांशी संपर्क करावा.