(दापोली / प्रतिनिधी)
मंडणगड येथील एका अल्पवयीन मुलीशी लग्न लावल्याचे दर्शवून तिच्याशी शारीरिक संबंध ठेवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. दापोली पोलिसांनी संशयिताला अटक केली आहे. पंधरा दिवसांत तालुक्यातच पोक्सो अंतर्गत दुसरा गुन्हा दाखल झाला आहे.
एका अल्पवयीन मुलीला फूस लावून एकाने मैत्रीचे संबंध जुळवले. त्यानंतर मंदिरामध्ये लग्न लावल्याचे दर्शवून त्या अल्पवयीन मुलीशी शारीरिक संबंध प्रस्थापित केल्याची तक्रार पीडित मुलीच्या नातेवाइकांनी पोलिस ठाण्यात नोंदवली. फिर्यादी मंडणगड तालुक्यातील असल्याने प्रथम मंडणगड पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. मात्र, या प्रकारातील संशयित आरोपी दापोली तालुक्यातील असल्याने हा गुन्हा दापोली पोलिस ठाण्याकडे वर्ग करण्यात आला आहे. संशयिताला पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. या घटनेचा तपास पोलिस उपनिरीक्षक जे. एच. चव्हाण करत आहेत.