(गुहागर)
मुलांना सुट्टी असल्याने सध्या अनेकांनी प्रवासाचे वा फिरायला जाण्याचे बेत आखले आहेत. यामुळे रस्त्यांवरही गाड्यांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या पाहायला मिळतात. या मे महिन्यात अपघाताचे प्रमाणही खूपच वाढले आहे. अशातच एक चटका लागणारी बातमी समोर आली आहे. चुलत बहिणीच्या लग्नासाठी येणाऱ्या पुतणीला आणण्यासाठी महेश प्रभाकर गुरव हा चिपळूण रेल्वेस्थानकावर चालला होता. पण चिपळूण शहरातील नाथ पै चौकात आयशरच्या रुपाने आलेल्या काळाने महेशचा घात केला, आणि गावासह लग्न घरावर दु:खाचा डोंगर कोसळला. ही घटना सोमवारी पहाटे घडली.
गुहागर तालुक्यातील वेळंब येथे रहाणारा महेश प्रभाकर गुरव (वय ४३) इलेक्ट्रीफिकेशन, पंप दुरुस्ती आदी कामे करत असे. आज मंगळवारी वेळंबला महेशच्या चुलत बहिणीचे लग्न असल्याने सोमवारी लग्न घरात साखरपुड्याचा कार्यक्रम होता. या समारंभासाठी महेशची पुतणी मुंबईहून रेल्वेने पहाटे चिपळूणला उतरणार होती. तिला आणण्यासाठी महेश पहाटे दुचाकी घेवून चिपळूण रेल्वेस्थानकावर चालला होता.
चिपळूण बाजारपेठेतील नाथ पै चौक येथे सोमवारी (ता. 9) पहाटे चारच्या सुमारास आयशर गाडीची महेशच्या दुचाकीला धडक बसली. या धडकेत महेश गंभीर जखमी झाला. त्याला तात्काळ येथील एका खासगी रूग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले. मात्र त्या आधीच त्याचा मृत्यू झाला होता. या अपघातानंतर संबंधीत आयशर चालक गाडीसह तेथून पसार झाला. घटनास्थळावर उपस्थित असलेल्या काहीजणांनी आयशरचा पाठलाग गेला. मात्र काळोखाचा फायदा घेऊन तो फरार झाला.
ही घटना वेळंबला समजाताच गुरव कुटुंबियांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. महेशला दोन लहान मुले आहेत. त्याच्या चुलत बहिणीचे लग्न असल्याने वेळंबला अनेक नातेवाईकांनी घर भरून गेलें होते. आनंदाच्या कार्याक्रमाआधी या सर्वाना अनपेक्षित दुखाच्या घटनेला सोमोरे जावे लागल्याने संपूर्ण गावं दुखाच्या खाईत बुडाला होता. महेशच्या अचानक जाण्याच्या दुर्देवी घटनेमुळे लग्नघरात सन्नाटा पसरला होता. महेशच्या पश्चात पत्नी, २ मुले, आई, वडील असा परिवार आहे.