(नवी दिल्ली / मुंबई)
गुडघ्याला बाशिंग बांधून बसलेल्या समस्त नवरदेव चिंतेत पडले आहेत. तर ग्रामीण भागातील मुलांना लग्नासाठी मुलीच तयार होत नसल्याचे भयानक वास्तव आज खेडोपाडी बघायला मिळत आहे. महाराष्ट्रात तर १००० मुलांमागे केवळ ९२३ मुली असल्याने लग्नासाठी मुली मिळणे दिवसेंदिवस अधिकच गंभीर समस्या बनत चालली आहे. ग्रामीण भागातील तरुणांच्या लग्नाचे सरासरी वय २१-२२ वर्षावरून थेट तिशीच्या वर पोहचले आहे. ही समस्या फक्त ग्रामीण भागातच राहिलेली नाही तर शहरी भागातही याचा परिणाम दिसू लागला आहे. मात्र ग्रामीण भागातील ही समस्या प्रकर्षाने जाणवत आहे.
मागच्या दीड-दोन दशकात ग्रामीण समाजव्यवस्था झपाट्याने बदलत गेली. आधुनिकीकरण, तंत्रज्ञान आणि पाश्चिमात्य संस्कृती या गोष्टी या बदलास कारणीभूत ठरतात. त्याचबरोबर लोकांच्या मानसिकतेतही झपाट्याने बदल झाले. पेशाने शेतकरी असले, आपली मुलगी कमी जरी शिकलेली असली तरीही मुलीच्या कुटुंबियांना आपल्या मुलींसाठी सरकारी नोकरी किंवा शहरात चांगल्या कंपनीत नोकरी असलेला जावई पाहिजे ही मानसिकता झालीआहे. ग्रामीण भागातील प्रत्येक मुलाचे वाढलेले लग्नाचे सरासरी वय आणि मुलींच्या आईवडिलांची बदललेली मानसिकता यामुळे लग्नाची समस्या आणखीनच गडद होत चालली आहे. जगातील बहुतांश देशांमध्ये मुलींपेक्षा जास्त मुले जन्माला येतात. लोकसंख्या स्थिर ठेवण्यासाठी किमान २.१ चा दर आवश्यक आहे.
महाराष्ट्रातील १२ जानेवारी रोजी नमुद केलेल्या ताज्या आकडेवारीनुसार एकूण लोकसंख्या १२ कोटी ४९ लाख ४ हजार ७१ आहे. तर त्यात पुरूषांची संख्या ६ कोटी ४७ लाख ५० हजार ६८५ तर महिलांची संख्या ६ कोटी १ लाख ५३ हजार ३८६ आहे. या दोन्हीतील फरक बघता भविष्यात ४५ लाख ९७ हजार २९९ पुरूष अविवाहित राहण्याची शक्यता नाकारता येत नाही. हेच गुणोत्तरीय प्रमाण १००० पुरुषांमागे केवळ ९२३ महिला असल्याने हजारामागे ७७ पुरूषांना लग्नासाठी मुली मिळणार नाहीत.
महाराष्ट्रातील गुणोत्तरीय प्रमाण (जानेवारी२०२४) एकूण लोकसंख्या – १२,४९,०४,०७१, पुरुष – ६, ४७,५०,६८५, महिला – ६,०१,५३,३८६ .फरक = ४५,९७,२९९
मुलीसह कुटुंबीयांच्याही अपेक्षा वाढत्या अपेक्षा
देशात महिलांचे प्रमाण हजार पुरुषामागे कमी असल्यामुळे साहजिकच मुलींच्या कुटुंबियांना आपल्या मुलींसाठी चांगले स्थळ मिळेल अशा अपेक्षा आहेत. जुन्या पद्धतीच्या चूल आणि मूल या संकल्पनेला झुगारुन मुली आधुनिकतेची आस धरताना आपल्याला पहायला मिळत आहेत. शेतकरी असणारे लोकंच शेतीला दुय्यम समजू लागल्यामुळे शेतकरी मुलीच्या अपेक्षा वाढल्या आणि जो तरुण मुंबई पुण्यासारख्या शहरात नोकरीला आहे अशा तरुणांना आपली मुलगी द्यावी असा समज लोकांमध्ये वाढू लागला आहे.