( चिपळूण )
लग्नाला 15 दिवस शिल्लक असतानाच तरुणाचा मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त होत आहे. चिपळूण शहरातील पेठमाप येथील एन्रॉन पुलानजीकच्या झाडावर आंबे काढण्यासाठी चढलेल्या तरुणाला वरून गेलेल्या विद्युत तारेचा झटका लागून त्याचा जागीच मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी सायंकाळी 5.30 वाजता घडली. याबाबत येथील पोलीस स्थानकात या घटनेची आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद झाली आहे.
अल्ताफ सलीम सुर्वे (23, सध्या रा. गोवळकोट रोड, पलोजी बाग, मुळचा आंध्रप्रदेश) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. तो गुरुवारी दुपारनंतर घराबाहेर पडला होता. त्यानंतर पेठमाप परिसरातील विद्युत पुरवठा अचानक खंडित झाला. त्यामुळे नेमका विद्युत पुरवठा कशामुळे बंद पडला त्याचा शोध महावितरणच्या कर्मचाऱ्यांमार्फत घेतला जात असताना एका तरुणाचा मृतदेह झाडावर लटकलेल्या स्थितीत आढळून आला. त्यानंतर काहीवेळाने मृत अल्ताफ सुर्वे याची ओळख पटली.
ज्या झाडावर मृतदेह आढळला त्याच्या जवळून अतिउच्चदाबाची विद्युत वहिनी गेलेली आहे. झाडाच्या फांदीला विद्युत वाहिनीचा झटका लागल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला असावा, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. त्यानुसार त्याच्या कुटुंबाला या घटनेची माहिती दिली. त्यानंतर सामाजिक कार्यकर्ते साजिद सरगुरोह व त्यांच्या सहकाऱ्यांनी हा मृतदेह झाडावरून खाली घेण्यास पोलिसांना मदत केली.
अल्ताफ हा बाजारपेठेतील एका चप्पलच्या दुकानात कामाला होता. त्याचे नुकतेच लग्नही ठरले होते. 22 मे रोजी त्याचा विवाह निश्चित झाला होता. मात्र त्याच्या जाण्याने हळहळ व्यक्त होत आहे. याबाबत येथील पोलीस स्थानकात आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली आहे.