( पुणे )
लग्नाच्या आमिषाने तरुणीवर अत्याचार करणाऱ्या व नंतर तीचा गर्भपात करणाऱ्या डॉक्टर विरोधात भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. संबंधित डॉक्टरने तरुणीकडून साठ हजार रुपये उसने घेत तिची फसवणूकही केल्याचा प्रकार सप्टेंबर 2022 ते फेब्रुवारी 2023 दरम्यान घडला होता. 26 वर्षीय तरुणीने तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी आरोपी डॉ. अंकुश गुंड याला अटक केली होती.
तरुणीच्या तक्रारीवरुन पोलिसांनी आरोपी डॉ. अंकुश एकनाथ गुंड (रा. आंबेगाव, पुणे) याच्यावर आयपीसी 376, 376 (2) (n), 312, 417, 420, 323, 506 नुसार गुन्हा (FIR) दाखल करुन अटक केली. आरोपीने अॅड. कृष्णा काजळे यांच्या मार्फत न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला. अॅड. काजळे यांनी न्यायालयात युक्तिवाद करताना सांगितले, तक्रारदार तरुणीच्या संमतीने दोघांमध्ये शारीरिक संबंध प्रस्थापित झाले होते. तरुणीने महाबळेश्वर येथे स्वत: हॉटेल बुक केले होते. तसेच या हॉटेलचे पैसे तिने स्वत: गुगल पे वरून दिले होते. याशिवाय हॉटेलच्या बिलांवर तिच्याच सह्या आहेत. तक्रारदार तरुणी ही स्वत: दुचाकीवरुन महाबळेश्वर येथे आली होती. तरुणीने ज्या हॉस्पिटलमध्ये गर्भपात केल्याचा उल्लेख केला आहे. त्या हॉस्पिटलमध्ये पोलिसांनी चौकशी केली असता अशा प्रकारचा गर्भपात केला नसल्याचे पोलीस चौकशीत समोर आले आहे. तसेच तरुणीने ज्या डॉक्टरांचे नाव घेतले ते डॉक्टर आणि आरोपी हे मित्र असल्याने तिने त्या डॉक्टरांचे नाव घेतले. डॉ. अंकुश हे तरुणीसोबत लग्न करण्यास तयार होते. याबाबत चर्चा करण्यासाठी आरोपी आणि तरुणीच्या घरच्यांची शिवाजीनगर येथील एका हॉटेलमध्ये बैठक झाली.
या बैठकीत तरुणीच्या भावाने आणि त्याच्या मित्राने आरोपीला मारहाण केली. त्याच रात्री आरोपीने पोलिसांकडे तक्रार दिली होती. डॉ. अंकुश याच्या विरोधात तक्रार दिल्यानंतर आरोपी स्वत: पोलीस ठाण्यात हजर झाला होता. हा प्रकार तरुणीच्या संमतीने झाला असून आरोपी डॉ. अंकुश गुंड याचा जामीन मंजूर करण्याची विनंती अॅड. कृष्णा काजळे यांनी न्यायालयाला केली. वकिलांचा युक्तिवाद ग्राह्य धरुन न्यायालयाने आरोपीचा 25 हजारांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला.
असे आहे प्रकरण
फिर्य़ादी तरुणीने दिलेल्या तक्रारीनुसार, तरुणी आणि डॉ. अंकुश यांच्यात प्रेमसंबध निर्माण झाले. त्यानंतर आरोपीने तरुणी सोबत शारीरिक संबंध ठेवले. यानंतर तरुणी गर्भवती राहिल्यावर तिला औषधी गोळ्या खायला देऊन गर्भपात केला. आर्थिक अडचण असल्याचे सांगून तिच्याकडून 50- 60 हजार रुपये घेतले. तसेच तिच्या नावावर आयफोन घेतला. त्यानंतर तरुणी पुन्हा गर्भवती असताना आरोपीने तिला मारहाण केली. तसेच पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यास आत्महत्या करण्याची धमकी दिल्याचे तक्रारीत नमूद केले आहे.
Post Views: 3,536