(लांजा)
लग्नाची बोलणी करण्यासाठी गेलेल्या तरुणावर किरकोळ वादातून कोयतीने वार केल्याने तो जखमी झाला. हा प्रकार लांजा तालुक्यात घडला. या प्रकरणी ४६ वर्षीय व्यक्तीवर लांजा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी राजेश एकनाथ चव्हाण (वय ४०) हे एका मुलीशी लग्न करण्यास इच्छुक होते. लग्नासंदर्भात राजेश चव्हाण आणि सुरेश पडये या दोघांमध्ये बोलणी सुरू होती. या संदर्भात ४ ऑगस्टला लग्नासंदर्भात बोलणे देखील झाले होते. लग्न करण्याचेदेखील निश्चित करण्यात आले होते. त्यानंतर ७ ऑगस्टला राजेश चव्हाण हे सुरेश पडये यांच्या घरी पुन्हा बोलणी करण्यासाठी दुपारी गेले होते. हे बोलणे सुरू असतानाच दोघांमध्ये किरकोळ स्वरूपात वाद झाला.
या वादातून सुरेश पडये याने आपल्या घरातील कोयती आणून राजेश चव्हाण यांच्या डोक्यावर वार केले. जखमी झालेल्या राजेश चव्हाण यांनी लांजा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. तक्रारीनुसार पोलिसांनी सुरेश पडये याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. याबाबत अधिक तपास पोलिस हेडकॉन्स्टेबल एन. एस. नावलेकर करत आहेत.