(जयपूर)
यंदाच्या आयपीएलमध्ये सलग तीन सामने जिंकत आयपीएलच्या गुणतालिकेत राजस्थानने पहिल्या झेप घेतली आहे. त्यानंतर लखनौ सुपर जायंट्स हा संघ दुसऱ्या स्थानी आला आहे. त्यानंतर आता आयपीएलमध्ये आज दोन्ही संघात स्पर्धेतील वर्चस्वासाठी सामना होणार आहे. लखनौचा केएल राहुल आणि राजस्थानचा संजू सॅमसन हे दोन्ही खेळाडू सामना जिंकून आयपीएलवर दावा ठोकण्याचा प्रयत्न करणार आहेत.
के. एल. राहुलच्या नेतृत्वातील लखनौ सुपर जायंट्सने संजू सॅमसनच्या राजस्थान रॉयल्सचा पराभव केला. कमी धावसंख्येच्या सामन्यात लखनौच्या गोलंदाजांनी अचूक टप्प्यावर मारा करत राजस्थानच्या फलंदाजांना बाद केले. लखनौने राजस्थानवर १० धावांनी विजय मिळवला. लखनौने दिलेल्या १५४ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना राजस्थानचा संघ १४४ धावांपर्यंत मजल मारु शकला. लखनौकडून आवेश खान याने सर्वाधिक तीन विकेट घेतल्या. लखनौने दिलेल्या १५५ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना राजस्थानने संयमी सुरुवात केली. याचा फटका राजस्थानला बसला.
जयपूर येथील सवाई मानसिंग स्टेडियममध्ये लखनौच्या संघाने केलेल्या १५४ धावांचा पाठलाग करताना राजस्थानची सुरुवात चांगली झाली. परंतु राजस्थानच्या यशस्वी जायस्वाल आणि जोस बटलर आक्रमक फलंदाजीसाठी ओळखले जातात, पण या जोडीने संथ फलंदाजी केली. जोस बटलर याने ४१ चेंडूत ४० धावांचे योगदान दिले. जोस बटलर याचा स्ट्राईक रेट १०० पेक्षा कमी होता. जोस बटलर याने आपल्या संथ फंलदाजीत चार चौकार आणि एक षटकार लगावला. जोस बलटर याच्याशिवाय यशस्वीनेही संथ फलंदाजी केली. यशस्वीने ३५ चेंडूत ४४ धावांचे योगदान दिले. यामध्ये त्याने दोन षटकार आणि चार चौकार लगावले. यशस्वी आणि जोस बटलर यांनी ११.३ षटकात ८७ धावांची भागिदारी केली. यशस्वी जायस्वाल याला स्टॉयनिसने तंबूत पाठवले.
त्यानंतर कर्णधार संजू सॅमसन धावबाद झाला. संजूला फक्त दोन धावांचे योगदान देता आले. जोस बटलर यानेही विकेट फेकली. शिमरोन हेटमायरही आज अपयशी ठरÞला. हेटमायरचा अडथळा आवेश खान याने दूर केला. बिनबाद ८७ वरुन राजस्थान चार बाद १०४ धावसंख्या अशी दयनिय अवस्था झाली होती. त्यानंतर पडिक्कल याने एका बाजूने किल्ला सांभाळण्याचा प्रयत्न केला. पण त्याला साथ मिळाली नाही. पडिक्कल २६ धावा काढून बाद झाला. ध्रुव जेरल याला खातेही उघडता आले नाही. रियान पराग १५ धावांवर नाबाद राहिला.
लखनौच्या गोलंदाजांनी पहिल्या चेंडूपासूनच अचूक टप्प्यावर मारा केला. नवीन उल हक याने चार षटकात फक्त १९ धावा दिल्या. आवेश खान याने चार षटकात २५ धावा खर्च करत तीन फलंदाजांना तंबूत धाडले तर मार्कस स्टॉयनिस याने दोन विकेट घेतल्या.
तत्पूर्वी लखनौच्या सलामीवीर फलंदाजांनी पॉवर प्लेमध्ये राजस्थानच्या गोलंदाजांचा समाचार घेतला. पहिल्या विकेटसाठी कर्णधार के एल राहुल आणि केली मायर्सने ८२ धावांची भागिदारी केली. राहुल ३२ चेंडूत ३८ धावांवर खेळत असताना जेसन होल्डरने त्याला बाद करून राजस्थानला ब्रेक थ्रू दिला. त्यानंतर केली मायर्स अर्धशतकी खेळी करून आश्विनच्या गोलंदाजीवर ५१ धावांवर बाद झाला. परंतु निकोलस पुरन आणि मार्कस स्टॉयनिसच्या सावध खेळीने लखनौच्या धावसंख्येचा आलेख उंचावला. त्यामुळे २० षटकात लखनौने ७ विकेट्स गमावत १५४ धावा केल्या.