(संगलट / इकबाल जमादार)
गेल्या काही दिवसापासून लंपी रोगाची चार-पाच गुरे खेड शहरांमध्ये फिरताना दिसत आहेत. याची दखल मुख्याधिकारी आणि पशुसंवर्धन अधिकारी घेत नसल्याने जनतेतून नाराजी व्यक्त होत आहे.
लंपी आजारामुळे जनावरांच्या शरिराला गाठी येतात, हा व्हायरसचा एक प्रकार आहे. 2019 मध्ये प्रथम भारतात या व्हायरसची लागण झाली होती. हा त्वचेचा रोग आहे, यामुळे जनावरांच्या शरिराला आलेल्या गाठींचा आकार मोठा होत जातो. हा व्हायरस जास्त वेगाने दुसऱ्या जनावरांमध्ये संक्रमीत होतो.
लंपी या आजाराच्या लक्षणांमध्ये प्रथम जनावरांना ताप येतो. नंतर त्यांचे वजन कमी होते, जनावरांच्या डोळ्यातून चिकट पाणी टिपकते, तोंडातून लाळ पडते, शरिरावर छोट्या गाठी यायला लागतात. जनावर दूध कमी देते, यामुळे जनावरांची तब्येत जास्त खराब होत जाते.
लंपीची लागण झालेल्या जनावरांना वेगळे ठेवणे गरजेचे असते. मात्र सदरची गुरे ही भर बाजारामध्ये पादचार्याला घासून चालत असल्याने नागरिकांमध्ये घबराट होत आहे. सदरच्या गुरांचे मालक या बाबीकडे लक्ष देताना दिसत नाहीत. त्यांनी गुरे उनाड सोडल्याने त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी जनतेतून होत आहे.