लंडनमध्ये शिक्षणासाठी गेलेल्या भारतीय तरुणीची हत्या झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. ही तरुणी मूळची तेलंगाणामधील असून हैदराबादमध्ये रहात होती. तेजस्विनी कोंथम (वय २७ वर्षे) असे मृत तरुणीचे नाव आहे. लंडनच्या वेम्बली परिसरात तिची चाकूने भोसकून करून हत्या करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. या हत्येप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे.
उच्च शिक्षणासाठी लंडनमध्ये गेलेल्या तेजस्विनीवर सकाळी १० वाजण्याच्या सुमारास हल्ला झाला व त्यात हत्या करण्यात आली. या प्रकरणी पोलिसांनी तिचा फ्लॅटमेट असणाऱ्या ब्राझिलियन नागरिकास अटक केली आहे. या प्रकरणात दोन आरोपींनी इमारतीवर हल्ला केला होता. त्यात तेजस्विनीचा जागीच मृत्यू झाला तर अन्य एक तरुणी जखमी झाली असून तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
मुळची हैदराबादची असलेली कोंथम तेजस्विनी पदव्युत्तर पदवीचे शिक्षण घेण्यासाठी मार्च महिन्यात लंडनला गेली होती. तिथे वेंबलीमधील नील्ड क्रेसेंट या भागात ती शेअरिंग फ्लॅटमध्ये राहत होती. काही दिवसांपूर्वी इथे ब्राझीलचा एक तरुणही राहण्यासाठी आला. मंगळवारी सकाळी १०च्या सुमारास या तरुणाने तेजस्विनीवर चाकूने हल्ला केला. या हल्ल्यात तिचा जागीच मृत्यू झाला. तर आणखी एक २८ वर्षीय तरुणी जखमी झाल्याचे पोलिसांनी सांगितले. पोलिसांनी या प्रकरणात एका तरुण आणि तरुणीला अटक केली आहे.
पोलिसांनी आणखी एक संशयित केव्हिन अँटोनियो लॉरेन्सो डे मोरैस याला अटक करण्यासाठी नागरिकांना मदतीचे आवाहन केले होते. त्याला हत्येच्या संशयात अटक करण्यात आली असून तो आता उत्तर लंडनमधील पोलिस कोठडीत आहे. त्याला पकडण्यासाठी नागरिकांनी केलेल्या मदतीबद्दल पोलिसांनी आभार व्यक्त केले आहेत. या प्रकरणातील मुख्य तपास अधिकारी लिंडा ब्रेडली यांनी याप्रकरणी तपास सुरु असून या मागील कारण शोधण्याचा प्रयत्न करत असल्याचे म्हटले आहे.