(राजकोट)
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिस-या वनडे सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारतासमोर ३५३ धावांचे आव्हान ठेवले होते. त्यानंतर मैदानात उतरलेल्या सलामीवीर रोहित शर्माने आक्रमक सुरुवात करीत जोरदार फटकेबाजी केली. यात त्याने एका देशात सर्वाधिक षटकार ठोकणारा फलंदाज म्हणून विक्रम नोंदविला. परंतु मधल्या फळीतील भारतीय फलंदाजांच्या हराकिरीमुळे भारताला दारुण पराभव स्वीकारावा लागला.
तत्पूर्वी कर्णधार रोहित शर्माने आक्रमक फलंदाजी करत अर्धशतक ठोकले होते. विशेष म्हणजे या खेळीदरम्यान त्याने तब्बल ५ षटकार ठोकले आणि त्याने षटकारांच्या बाबतीतला एक मोठा विक्रमदेखील नोंदवला. रोहित शर्मा हा एका देशात सर्वाधिक षटकार मारणारा फलंदाज ठरला. त्याने भारतात २५७ षटकार ठोकले.
तिस-या वनडे सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारतासमोर विजयासाठी ३५३ धावांचे आव्हान ठेवले होते. भारताकडून हे आव्हान पार करण्यासाठी रोहित शर्माच्या जोडीला वॉशिंग्टन सुंदर आला. भारताच्या डावाची सर्व सूत्रे कर्णधार रोहित शर्माने आपल्या हातात घेतली. त्याने आक्रमक फलंदाजी करत कांगारूंच्या गोलंदाजांची चांगलीच धुलाई केली. रोहितने सुंदरच्या साथीने ७८ धावांची सलामी दिली. यात सुंदरचे फक्त १८ धावांचे योगदान होते. अखेर ही जोडी मॅक्सवेलने फोडली. त्याने सुंदरला बाद केले. मात्र, अर्धशतक पूर्ण करणा-या रोहितने विराट कोहलीसोबत भागीदारी रचत भारताचे १६ व्या षटकात शतक धावफलकावर लावले. मात्र, त्यानंतर मधल्या फळीतील फलंदाजांनी नांगी टाकली. त्यामुळे ऑस्ट्रेलियाचे आव्हान पेलता आले नाही. तथापि, रोहित शर्माने जोरदार फटकेबाजी करीत नवा विक्रम नोंदवला.