(मुंबई)
एमएससी बँक बेकायदेशीर सावकारी प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे नेते आमदार रोहित पवार तसेच उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या नेत्या आणि मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांना “बॉडी बॅग” प्रकरणात अंमलबजावणी संचालनालय अर्थात् ईडीने शुक्रवारी समन्स बजावला आहे.
महाराष्ट्र राज्य सहकारी (एमएससी) बँक घोटाळाप्रकरणी २४ जानेवारी रोजी हजर राहण्याचा आदेश ईडीने रोहित पवार यांना दिला. कन्नड कारखान्याच्या व्यवहाराबद्दलही रोहित पवार यांच्यावर ईडीचा संशय आहे. १५ दिवसांपूर्वीच बारामती अॅग्रोवर छापेमारी करण्यात आली. त्यानंतर त्यांना ईडीने समन्स बजावला आहे.
बॉडीबॅग प्रकरणात मागील काही दिवसांपासून किशोरी पेडणेकर यांची चौकशी सुरू होती. पेडणेकरांनी डॉ. हरिदास राठोड (डेप्युटी डीन, केंद्रीय खरेदी विभागाचा अतिरिक्त कार्यभार) यांना व्हीआयपीएलकडून १२०० बॉडी बॅग खरेदी करण्यासाठी मे ते जून २०२० या कालावधीत प्रत्येकी ६,७१९ रुपयांना विकत घेण्यास भाग पाडल्याचा आरोप आहे. याप्रकरणी मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने नुकताच पेडणेकरांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. २०२० मध्ये किशोरी पेडणेकर महापौर असताना त्यांच्या आदेशानेच पालिका अधिकाऱ्यांनी या बॉडी बॅगची खरेदी केल्याचा उल्लेख आर्थिक गुन्हे शाखेच्या एफआयआरमध्ये आहे.