कर्णधार रोहित शर्माचे वादळी शतक, विराट कोहलीचे नाबाद अर्धशतक तसेच इशान किशन व श्रेयस अय्यर यांची उपयुक्त फलंदाजी आणि जसप्रीत बुमराहची भेदक गोलंदाजी यांच्या जोरावर यजमान भारताने अफगाणिस्तानचा 8 गडी राखून पराभव केला. भारताने एकदिवसीय सामन्यांच्या विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेत सलग दुसऱ्या विजयाची नोंद केली. दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या या सामन्यात अफगाणिस्तानने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना 50 षटकात 8 गडी गमावून 272 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात भारतानं 35 षटकात 2 गडी गमावत 273 धावा करत विजय साकारला. रोहित शर्मा सामन्याचा मानकरी ठरला.
रोहित शर्माने अफगाणिस्तानविरुद्ध जोरदार फटकेबाजी करीत सचिनच्या सर्वाधिक षटकारांचा, ख्रिस गेलच्या सर्वाधिक षटकारांचा, विश्वचषकात सर्वात वेगवान एक हजार धावा. यासह कपिल देव यांच्या ४० वर्षांपूर्वीचा विक्रम मोडित काढला. रोहित शर्माने अवघ्या ६३ चेंडूत शतक ठोकले. याआधी हा विक्रम कपिल देवच्या नावावर होता. कपिल देवने १९८३ च्या विश्वचषकात ७२ चेंडूत शतक ठोकले होते. हा विक्रम रोहित शर्माने मोडीत काढला.
वन-डे विश्वचषक स्पर्धेत सर्वाधिक षटकार लगावण्याचा विक्रमही रोहित शर्माने आपल्या नावावर केला आहे. त्याने अफगाणिस्तान विरुद्धच्या सामन्यात या विक्रमाला गवसणी घातली. त्याने विश्वचषक स्पर्धेत ५५४ षटकार लगावत हा विक्रम आपल्या नावावर केला. त्याने वेस्टइंडिजचा आक्रमक फलंदाज क्रिस गेलचा विक्रम मोडला आहे. ख्रिस गेलने विश्वचषक स्पर्धेत ५५३ षटकार लगावले होते. दरम्यान हिटमॅन रोहित शर्माने क्रिस गेलचा विक्रम मोडित काढला आहे.
अफगाणिस्तानने विजयासाठी दिलेल्या 273 धावांचा पाठलाग करताना भारताची सुरुवातच धडाकेबाज झाली. कर्णधार रोहित शर्मा व इशान किशन यांनी भक्कम सलामी देताना अफगाणिस्तानच्या गोलंदाजीवर हल्ला चढवला. त्यात रोहित अग्रेसर होता. त्याने चौकार व षटकारांची आतषबाजी करत मोठ्या खेळीचा पाया रचला. या जोडीने 12 व्या षटकांतच संघाचे शतक फलकावर लावले. त्यावेळी रोहितने आपले अर्धशतकही थाटात पूर्ण केले.
रोहित शर्माने आज कर्णधारास साजेशी खेळी करताना शानदार शतक ठोकले. या सामन्यात अफगाणिस्तानने भारताला विजयासाठी २७३ धावांचे आव्हान दिले होते. या आव्हानांचा पाठलाग करताना रोहित शर्माने ईशान किशनच्या साथीने भारताला शतकी सलामी दिली. रोहित शर्माने आज वन डे कारकिर्दीतील ३१ वे शतक ठोकले. त्याचे हे विश्वचषकातील ७ वे शतक आहे.
India march to their second successive win off the back of a dominant display in Delhi 💪#CWC23 #INDvAFG pic.twitter.com/zZdVDmmCEU
— ICC (@ICC) October 11, 2023
या दोघांनीही अफगाणिस्तानच्या गोलंदाजीचा पालापाचोळा करताना 19 व्या षटकात संघाचे दीडशतक फलकावर लावले. त्यापूर्वी रोहितने 31 वे एकदिवसीय शतक साकार केले. त्याचवेळी अर्धशतकाच्या जवळ आलेला इशान अनावश्यक फटका खेळताना 47 धावांवर बाद झाला. या खेळीत त्याने 47 चेंडूत 5 चौकार व 2 षटकार मारले. रोहितला साथ देण्यासाठी आलेल्या विराट कोहलीने सावध फलंदाजी केली. या जोडीने 25 व्या षटकातच संघाचे द्विशतक फलकावर लावले. त्यांनी 49 धावांची भागीदारी केली.
दीड शतकाकडे कूच करत असलेला रोहित रशीद खानच्या गोलंदाजीवर अनावश्यक फटका मारण्याच्या प्रयत्नात 131 धावांवर बाद झाला. त्याने या खेळीत 84 चेंडूंचा सामना करताना 16 चौकार व 5 षटकार फटकावले. तो परतल्यावर कोहली व श्रेयस अय्यर यांनी तडाखेबंद फलंदाजी करत संघाचा विजय 35 षटकांतच साकार केला. कोहलीने यंदाच्या विश्वकरंडक स्पर्धेतील सलग दुसरे अर्धशतक नोंदवले. त्याने नाबाद 55 धावांच्या खेळीत 56 चेंडूत 6 चौकार फटकावले. अय्यरने नाबाद 25 धावा करताना 23 चेंडूत 1 चौकार व 1 षटकार फटकावला. अफगाणिस्तानकडून रशीद खानने 2 गडी बाद केले.
तत्पूर्वी, अफगाणिस्तानचा कर्णधार हसमतुल्लाह शाहिदीने नाणेफेक जिंकली व पहिल्यांदा फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. रेहमनुल्लाह गुरबाज व इब्राहीम झद्रान यांनी चांगली सुरुवात केली. मात्र, जसप्रीत बुमराहने झद्रानला बाद केले व भारताला पहिले यश मिळवून दिले. दुसरीकडे अष्टपैलू हार्दिक पंड्याने आपला वाढदिवस साजरा करत भारताला गुरबाजला बाद करत दुसरे यश मिळवून दिले.
रवीचंद्रन अश्विनच्या जागी संघात आलेल्या शार्दुल ठाकूरने रेहमत शहाला बाद केले व त्यांची स्थिती 3 बाद 63 अशी बिकट केली. मात्र, त्याचवेळी कर्णधार शाहिदीने अजमतुल्लाह ओमरझाईसह डाव सावरला. या दोघांनी भारतीय गोलंदाजीवर आक्रमक फलंदाजी केली व संघाचे शतक फलकावर लावले. ही जोडी फोडण्यासाठी भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माने अनेक गोलंदाज वापरले. मात्र, त्याला यश आले नाही. या जोडीने संघाचे दीडशतक पूर्ण करताना शतकी भागीदारीही केली.
ओमरझाईने आपले अर्धशतक थाटात पूर्ण केले. मात्र, तो पंड्याच्या सापळ्यात अडकला व 62 धावांवर त्रिफळाबाद झाला. त्याने या खेळीत 69 चेंडूंचा सामना करताना 2 चौकार व 4 षटकार फटकावले. शाहीदने महंमद नबीच्या साथीत संघाला द्विशतकी मजल मारून दिली. शाहिदीनेही अर्धशतक पूर्ण केले. त्यानंतर मात्र, धावांचा वेग वाढवण्याच्या प्रयत्नात तो 72 धावांवर बाद झाला. त्याला कुलदीप यादवने चकवले. शाहिदीने आपल्या खेळीत 88 चेंडूत 8 चौकार व 1 षटकारासह 80 धावा केल्या. पाठोपाठ नजीबुल्लाह झद्रानला बुमराहने पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला.
यावेळी आक्रमक फलंदाजीसाठी ओळखला जात असलेला रशीद खान खेळपट्टीवर होता व त्याने मुजीब उर रेहमानच्या साथीत संघाला अडीचशे धावांचा पल्ला पार करून दिला. रशीद 16 धावांवर बाद झाला. रेहमानने नाबाद 10 तर, नवीन उल हकने नाबाद 9 धावा करत संघाला 8 बाद 272 अशी समाधानकारक धावसंख्या उभारून दिली. भारताकडून जसप्रीत बुमराहने सर्वाधिक 4 गडी बाद केले. हार्दिक पंड्याने 2 बळी घेतले.