[ चिपळूण /प्रतिनिधी ]
दर दिवशी रोहा रेल्वे स्थानकावरून रोहा-दिवा पॅसेंजर गाडी सायंकाळी ४ वाजता सुटते. मात्र गणेशोत्सवात आयत्या वेळी ही गाडी रोह्यावरून न सोडता चिपळूणवरून सोडण्याच्या निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतल्याने गाडी भरगच्च भरून आल्याने रोह्यातील प्रवाशांना जागा मिळाली नाही. त्यमुळे संतप्त झालेल्या प्रवाशांनी गाडी रोखून धरली. गणेशोत्सवात दिवा-चिपळूण गाडी कोकण रेल्वे मार्गांवर धावत होती. ही गाडी ५ सप्टेंबरपर्यंत या मार्गांवर धावणार होती. ६ तारखेपासून तीच गाडी रोह्यावरून सायंकाळी ४ : १५ वाजता दिव्याच्या दिशेने नेहमीप्रमाणे जाणार होती. या गाडीसाठी शेकडो चाकरमानी दुपारी १२ वाजल्यापासून वाट पाहात होते. परंतु गाडी चिपळूणवरून सोडण्याचा तडकाफडकी निर्णय घेतला गेला. मुंबईच्या दिशेने जाण्यासाठी गाडी उपलब्ध नसल्याने प्रवाशांनी रेल्वे प्रशासनाला धारेवर धरले. संतप्त प्रवाशांनी रेल्वे अधिकाऱ्यांना घेराव घातला व रेल्वे कार्यालयात कितीतरी वेळ ठिय्या मांडला होता.
काही काळ वातावरण तंग झाल्याने रेल्वे प्रशासनाने रोहा पोलिसांना पाचारण केले. पोलिस निरीक्षक प्रमोद बाबर यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक विनोद वायंगणकर, महिला उपनिरीक्षक जवादे व अन्य पोलिस कर्मचाऱ्यांनी प्रवाशांची समजूत काढली.प्रवासी अडकलेरोहा ते पनवेल मार्गावर धावणाऱ्या हॉलिडे स्पेशल जबलपूर -कोईम्बतूर, मडगाव- मांडवी व अन्य रेल्वे गाड्यांत रखडलेल्या प्रवाशांची व्यवस्था करण्यात आली. तरीदेखील शेकडो प्रवासी रोहा रेल्वे स्थानकात अडकून पडले होते. गाडी चुकलेल्या प्रवाशांचे तिकिटाचे पैसे परत मिळावे, अशी मागणी रेल्वे प्रवासी संघर्ष संघटनेचे अध्यक्ष फैसल अधिकारी, भालचंद्र पवार, विश्वनाथ जाधव, प्रमोद गायकवाड, करण मोरे यांनी रेल्वे प्रशासनाकडे केली.
५ सप्टेंबर रोजी फेरीची मुदत संपलेल्या चिपळूण-दिवा गाडीच्या फेऱ्या आणखी ५ ते ६ दिवस वाढवण्यात याव्यात, अशी मागणी चिपळूण तालुक्यातील चाकरमानी व रेल्वे प्रवासीवर्गाने बेलापूर कार्यालयात केली होती. त्या अनुषंगाने वरिष्ठ मंडळीने आदेश दिल्याने रोहा-दिवा गाडी आम्ही रोहा स्थानकावरून न सोडता चिपळूणवरून सोडण्याचा निर्णय घेतला. गैरसोय झालेल्या प्रवाशांच्या तिकिटाचे पैसे परत देणार अशी घोषणा केली आहे. – आर. व्ही. जगताप, रेल्वे पोलिस निरीक्षक