(संगलट-खेड / प्रतिनिधी )
रास्त धान्य दुकानदारांना दरमहा कमिशन देण्याची प्रक्रिया शासन स्तरावर सुरू आहे. त्यामुळे त्याची लवकरच अंमलबजावणी केली जाईल, असे आश्वासन अन्न नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी जिल्हा रेशनिंग व केरोसीन चालक-मालक संघटनेला दिले आहे. तसेच रखडलेले कमिशनही जमा झाले असून आनंदाचा शिधाही दुकानदारांना पहिल्यांदा उधारीवर दिला जाणार आहे. त्यामुळे संघटनेच्या लढ्याला यश आले आहे.
काही दिवसांपूर्वीच संघटनेचे जिल्हाध्यक्ष अशोक कदम यांनी शासनाला निवेदन देऊन पाच महिन्यांपासून दुकानदारांचे रखडलेले कमिशन त्वरीत जमा करावे, दुकानदारांना कमिशनची रक्कम दर महिन्याला मिळावी, १ सप्टेंबरपर्यंत कमिशनची रक्कम जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्याला मिळावी, जर कमिशन या कालावधीत देता आले नाही तर जिल्हा प्रशासनाने आनंदाचा शिधा पैसे न भरता धान्य दुकानदारांना वितरणासाठी उपलब्ध करून द्यावा व विक्री झाल्यानंतर चलनाद्वारे पैसे भरून घ्यावे, आदी मागण्या केल्या होत्या.
दोन दिवसांपूर्वी आमदार शेखर निकम यांच्या माध्यमातून मंत्री छगन भुजबळ यांची मुंबईत जाऊन भेट घेतली. यावेळी संघटनेचे जिल्हाध्यक्ष कदम यांनी दुकानदारांच्या अडचणी भुजबळ यांच्यासमोर मांडल्या. त्यानंतर त्यांनी वरील आश्वासन दिले. तसेच ५ महिन्यांपैकी तीन महिन्याचे कमिशन जमा करण्यासह आनंदाचा शिधा पहिलांदा उधारीवर देण्याची मागणी मान्य केली. अन्य मागण्यांबाबतही सकारात्मक निर्णय घेतले जातील असे सांगितले. यावेळी संघटनेचे पदाधिकारी रमेश राणे, शशिकांत दळवी, विजय राऊत, प्रकाश आग्रे, राकेश जाधव, राजू जाधव, सचिन साडविलकर आदी उपस्थित होते.