(नागपूर)
आगामी लोकसभा निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून महायुती सरकारने राज्यातील दारिद्र्यरेषेखालील अंत्योदय शिधापत्रिकाधारक कुटुंबातील २४ लाख ५८ हजार ७४७ महिलांना प्रत्येकी एक साडी मोफत देण्याचा निर्णय घेतला आहे. मकरसंक्रांतीपासून या निर्णयाची अंमलबजावणी होणार आहे.
या योजनेसाठी पुरवणी योजनांमध्ये १२५ कोटींची तरतूद करण्यात आली. या निधीतून सुमारे ३६५ रुपये किमतीच्या सिल्क आर्ट साड्यांची खरेदी केली जाईल. ५ रंगांचे पर्याय असणा-या या साड्या गरीब महिलांना रेशन दुकानावर प्रत्येकी एक मिळतील, अशी माहिती वस्त्रोद्योगमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे.
मध्य प्रदेशात ‘लाडली बहना’ योजनेच्या माध्यमातून गरीब महिलांना दरमहा १५०० रुपयांची मदत दिल्यामुळे भाजपला तेथे पुन्हा स्पष्ट बहुमतासह सत्ता मिळाली. २०२४ च्या लोकसभा व विधानसभा निवडणुकीत जास्तीत जास्त महिला मते मिळवण्याचा उद्देशाने महायुती सरकारनेही राज्यातील गरीब महिलांना खुश करण्यासाठी हा निर्णय घेतला आहे.
वस्त्रोद्योग मंत्रालयाने महिलांना देण्यासाठी आकर्षक असे पाच रंग निवडले आहेत. सरकारला एक साडी ३५५ रुपये + ५ टक्के जीएसटी धरून सुमारे ३६५ रुपयांना पडेल. अन्न व नागरी पुरवठा विभागाच्या तालुका स्तरापर्यंतच्या गोदामापर्यंत या साड्या पोहोचवण्याची जबाबदारी यंत्रमाग महामंडळाची राहील. शासकीय मान्यताप्राप्त प्रयोगशाळेतून साडीचा दर्जा आणि निकषांप्रमाणे तयार झाली की नाही हे तपासून घेण्यात येणार आहे.