(रत्नागिरी/ प्रतिनिधी)
मडगाव एक्स्प्रेसने प्रवास करणार्या 20 वर्षीय तरुणीचे 3 लाख 57 हजार रुपयांचे दागिने अज्ञाताने लंपास केल्याची घटना 23 मे रोजी दु. 3.30 वा. च्या सुमारास घडली. याबाबतची फिर्याद सोनल राज ऑबेराय (20, नेरुळ, नवी मुंबई) यांनी खेड पोलीस स्थानकात दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ऑबेराय या थिवीम रेल्वेस्टेशनवरुन मडगाव नागपूर स्पेशल एक्स्प्रेसने प्रवास करत होत्या. चिपळूण रेल्वे स्थानकादरम्यान त्यांना झोप लागली. खेड रेल्वे स्थानकावर गाडी थांबवलेली असतानच एका अनोळखी इसमाने ट्रेन चालू होताच त्यांच्या हातातील हॅण्डबॅग अलगद चोरुन दरवाजातून उडी मारुन पळून गेला. या बॅगेत 1 लाख 85 हजार रुपयांची सोन्याची चेन, 1 लाख 45 हजार रु. सोन्याचे ब्रेसलेट, 22 हजार रुपये किंमतीचा विवो कंपनीचा मोबाईल, चष्मा असा एकूण 3 लाख 57 हजार रुपयांचा ऐवज लांबवला.
खेड पोलीस स्थानकात अज्ञाताविरोधात भादविकलम 379 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.