( रत्नागिरी / प्रतिनिधी )
मडगाव ते मुंबई असा रेल्वेने प्रवास करताना पँटच्या खिशात ठेवलेले दागिने लंपास झाल्याचा प्रकार १९ डिसेंबर रोजी रात्री ११:४५ वाजता घडला. रत्नागिरी रेल्वेस्थानकात गाडी आली असता हा प्रकार लक्षात आला. या प्रकरणी रत्नागिरी शहर पोलिस स्थानकात २४ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सुंदर दिनकर देसाई (४७, रा. काल्हेर, ता. भिवंडी, ठाणे) यांचा चायनीजचा व्यवसाय आहे. ते १९ रोजी मत्स्यगंधा एक्स्प्रेसमधून मडगाव ते मुंबई असा प्रवास करत होते.. प्रवासादरम्यान त्यांनी आपल्या गळ्यातील दागिने एका पिशवीत बांधून ट्रॅक पँटच्या खिशात ठेवले होते. गाडी रत्नागिरी रेल्वेस्थानकात आली असता ते बसलेल्या जागेवर आरक्षणा असलेली व्यक्ती आली.
त्यांनी सुंदर देसाई यांना उठविले असता, देसाई यांनी झोपेतच पँटच्या खिशात हात घालून पाहिले. त्यावेळी त्यांना दागिने असलेली पिशवी सापडली नाही. याबाबत पोलिस अधिक तपास करीत आहेत.