(रत्नागिरी)
रत्नागिरी रेल्वे पोलीस आणि कर्मचारी यांच्या प्रसंगावधाने रेल्वे प्रवाशाच्या बॅगमधून पैसे आणि मोबाईल चोरणाऱ्या एका अट्टल चोराला त्वरित पकडण्यात यश आले. कोकण रेल्वेच्या या कर्मचाऱ्याचे कौतुक होत आहे.
आज शुक्रवारी सकाळी १० वाजता ही घटना रत्नागिरी रेल्वे स्थानकामध्ये घडली. त्या चोरट्याला शहर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. नारायण आप्पा रेडकर राहणार जैतापूर (सध्या राहणार डोंबिवली) हे प्रवासी तुतारी एक्स्प्रेस मधून रत्नागिरी स्थानकात उतरले. नारायण रेडकर यांची मोटार सायकल दुसऱ्या ट्रेनने येणार असल्याने ते प्रवाशी रूममध्ये विश्रांती घेत होते. ९ वाजताच्या सुमारास वेटींग्ज रूममध्ये रेडकर यांची बाजूला असलेली बॅग त्या चोरट्यांने काही क्षणात लंपास केली. श्री. रेडकर यांना आपली बॅग बाजुला नसल्याचे कळताच त्यांनी तातडीने पार्सल कर्मचारी आणि स्थानक अधीक्षक श्री. कोवे आणि रेल्वे पोलीस यांना माहिती दिली. स्टेशन अधीक्षक यांनी तातडीने रेल्वे पोलीस यांना चोरीची माहिती दिल्यावर सीसीटीव्ही फुटेजवरून रेल्वे पोलीस दीपक करगुडे यांनी त्या चोरट्याचा चेहरा लगेच ओळखला.
हा चोरटा रेल्वे स्टेशनवरच वावरत असल्याचे फुटेजमध्ये दिसत होते. तो मुंबईला जायला ट्रेन केव्हा आहे याची चौकशी रेल्वे पोलीसांकडेच करीत होता. ती बॅग लंपास करून त्याने स्टेशन आवारातच त्या बॅगेतील मोबाइल आणि पैसे आणि तिकीट चोरले होते. त्यानंतर ती बॅग बाजुला टाकून ठेवली होती. अखेर रेल्वे पोलिसांनी या स्टेशनवर वावरणाऱ्या चोरट्याला शिताफीने पकडले. यानंतर पैसे आणि मोबाईल परत श्री रेडकर यांना देण्यात आला. श्री रेडकर यांनी स्टेशन अधीक्षक, रेल्वे पोलीस आणि कर्मचारी यांना धन्यवाद दिले. कोकण रेल्वेची प्रतिमा उंचावण्यासाठी ही घटना बोलकी आहे असे प्रवाशी नारायण रेडकर यांनी सांगितले.