(बालासोर)
ओडिशा रेल्वे अपघाताच्या चौकशीला सुरुवात झाली असून, केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) संपूर्ण बहनगा रेल्वे स्टेशन सील केले आहे. पुढील आदेश मिळेपर्यंत या स्थानकात एकही प्रवासी ट्रेन किंवा मालगाडी थांबणार नाही. अशी माहिती रेल्वे अधिकारी आदित्य कुमार चौधरी यांनी दिली. बहनगा स्थानकासह अपघातस्थळावरून अनेक महत्त्वाचे पुरावे तपास अधिकाऱ्यांच्या हाती लागले आहेत. त्यामुळे सीबीआय अधिकारी या परिसरातील कानाकोपऱ्याची कसून झडती करत आहेत.
ओडिशा रेल्वे अपघाताच्या चौकशीची मागणी झाल्यानंतर सीबीआयने तपासाची सूत्रे हाती घेतली. या यंत्रणेचे पथक नुकतेच दुर्घटनास्थळी पोहोचले. येथील परिसरातून काही महत्त्वाचे पुरावे गोळा करण्यात येत आहेत. त्यानंतर तपास पथक थेट बहनगा रेल्वे स्थानकात धडकले आणि तब्बल दोन तास स्थानकातील लॉग बुक, रिले पॅनेल आणि रिले रूमची झडती घेण्यात आली. सर्व कागदपत्रांची बारकाईने तपासणी केल्यानंतर लॉग बुक, रिले पॅनेल व इलेक्ट्रॉनिक उपकरणे जप्त करण्यात आली. तसेच दोन रूम आणि डाटा लॉकर सील केले आहेत. दरम्यान, या मार्गावरून दररोज जवळपास १७० एक्सप्रेस जातात. अपघातांनंतर येथे ७ एक्सप्रेस थांबल्या होत्या. आता चौकशी दरम्यान बहनगा स्टेशन सील केल्याने एकही प्रवासी ट्रेन वा मालगाडी येथे थांबणार नाही.